

बंगळूर : देशातील प्रमुख राष्ट्रीय नेत्यांच्या मांदियाळीत शनिवारी दुपारी १२.३० वाजता बंगळूर येथील कंठिरवा स्टेडियमवर कर्नाटकाचे ३२ वे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री म्हणून डी. के. शिवकुमार यांनी शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सिद्धरामय्या दुसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्या सोबत ८ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे.
सिद्धरामय्यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळात आमदार जी परमेश्वर, केएच मुनियप्पा, एमबी पाटील, केजी जॉर्ज यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. सतीश जारकीहोळी, प्रियांक खर्गे, रामलिंगा रेड्डी आणि बीझेड जमीर अहमद खान यांनीही नवनिर्वाचित कर्नाटक सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली.
शपथविधी सोहळ्याला कंठिरवा स्टेडियममध्ये मोठी गर्दी होती. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी- वाड्रा यांनी उपस्थितांना हात उंचावून अभिवादन केले.
शपथविधी काँग्रेसच्या नेत्यांचा असला तरी या सोहळ्याला काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सपासून तमिळनाडूमधील द्रमुक पक्षापर्यंत भाजपेतर सार्याच पक्षांचे नेते उपस्थित राहिले आहेत. त्यामुळे हा शपथविधी म्हणजे भाजपविरोधी शक्तीप्रदर्शन आणि पुढच्या वर्षी होणार्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा काँग्रेस आघाडीचा बिगुलच मानला जात आहे.
“ही आनंदाची बाब आहे की कर्नाटकात नवीन आणि मजबूत काँग्रेस सरकार सत्तेवर आले आहे. याचा फायदा कर्नाटकला होईल आणि त्यामुळे देशात चांगले वातावरण निर्माण होत आहे”, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे.
मंत्रिमंडळात पहिल्या टप्प्यात ८ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी-वाड्रा यांच्यासह माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग, जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुला, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे प्रतिनिधी यांच्यासह यूपीए मित्र पक्षांचे वरिष्ठ नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले आहेत. त्यामुळे एकप्रकारे हे भाजपविरोधी शक्तिप्रदर्शनच असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.
भाजपेतर सगळ्या पक्षांना एकत्र आणून आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करता येईल, असा काँग्रेसचा अंदाज आहे. त्यामुळेच आठ राज्यांचे मुख्यमंत्री, चार राज्यांचे माजी मुख्यमंत्री तसेच सगळ्या प्रमुख पक्षांच्या मुख्य नेत्यांना सिद्धरामय्यांच्या शपथविधी सोहळ्याला निमंत्रित करण्यात आले. भाजपेतर दुसरी आघाडी करण्याचा काँग्रेसचा हा प्रयत्न आहे. सगळ्या नेत्यांनी निमंत्रण स्वीकारले आहे. पैकी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांचा ऐनवेळी कर्नाटक दौरा रद्द झाला असून त्यांचे प्रतिनिधी सोहळ्यास उपस्थित राहिले.
मान्यवरांना झेड प्लस सुरक्षा
सोहळ्यास उपस्थित राहणार्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह विविध राज्यांचे मुख्यमंत्री व व्हीआयपींना झेड प्लस व झेड कॅटेगरीची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. तसेच सीआरपीएफ, ए. एस. एल. पथकांचा गराडा असणार आहे. १२ एसीपी, ११ राखीव पोलिस निरीक्षक, ११ राखीव उपनिरीक्षक, २४ सहायक राखीव उपनिरीक्षक, २०६ पोलिस कॉन्स्टेबल फक्त नेत्यांच्या सुरक्षेसाठी नियुक्त आहेत.
अतिरिक्त पोलिस बंदोबस्त
शपथविधी सोहळ्याच्या बंदोबस्तासाठी दोन पोलिस आयुक्तांसह अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली आठ डीसीपी, १० एसीपी, २८ इन्स्पेक्टर, १५०० हून अधिक पोलिस व रहदारी नियंत्रणासाठी ५०० रहदारी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. व्हीव्हीआयपी प्रवेशासाठी स्वतंत्र सोय केली असून, २ गेटमधून व्हीव्हीआयपी वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta