बंगळूर : बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित शक्ती योजना अर्थात महिलांसाठी मोफत बस प्रवास योजनेचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी आज (दि.११) उद्घाटन केले. बंगळूरमध्ये विधानसौंधसमोर हा कार्यक्रम पार पडला. राज्यभरात ही योजना लागू करण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला कर्नाटकाची रहिवाशी असली पाहिजे. शिवाय प्रवास करताना ती कर्नाटकाची रहिवाशी असल्याचा पुरावा तिच्यासोबत पाहिजे. अशी अट घालण्यात आली आहे. तीन महिन्यांत महिलांना स्मार्ट कार्ड देण्यात येणार असून स्मार्ट कार्डचेही अनावरणही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यभरात महिलांना शक्ती योजनेअंतर्गत प्रवास करण्याची सवलत आहे. मात्र, महिलांना सेवा सिंधु पार्टलवर शक्ती स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे.
यावेळी परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी, आ. रिझवान अर्शद , केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन, मंत्री एम. राजीव चंद्रशेखर, एस. के. जॉर्ज, दिनेश गुंडूराव, कृष्णा भैरेगौडा, बी. जे. जमीर अहमदखान, सुरेश बी. एस., परिवहन मंडळ सेक्रेटरी डॉ. एन. व्ही. प्रसाद यांना आमंत्रित करण्यात आले होते.
वायव्य परिवहन मंडळात 4,505 बस सज्ज
राज्यात महिला प्रवाशांना परिवहन मंडळाच्या साध्या बसमध्ये मोफत प्रवास सुविधेसाठी ‘शक्ती स्मार्ट योजने’ अंतर्गत विशेष प्रकारचे शून्य रक्कमेचे बसचे तिकीट देण्यात येणार आहे. 55 बस डेपोत मिळून 4,505 बस महिला प्रवाशांना सवलत देण्यास सज्ज असल्याची माहिती परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक भरत एस. यांनी दिली आहे. वायव्य परिवहन महामंडळाच्या अंतर्गत बेळगाव,धारवाड, बागलकोट, गदग, हावेरी आणि कारवार जिल्ह्यांमध्ये 55 बस डेपो आहेत. सरासरी 4,505 बसमधून दररोज 15 ते 16 लाख कि.मी. धावतात. यामध्ये 16 लाख 40 हजार ते 17 लाख 50 हजार प्रवासी प्रवास करतात. वायव्य परिवहन महामंडळात एकूण 4,167 साध्या बस आहेत. दररोज 7 ते 8 लाख महिला प्रवास करतील असा अंदाज आहे.
अटी अशा
आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, वाहन परवाना, रेेशनकार्ड यापैकी एक पुरावा प्रवास करताना जवळ असणे अनिवार्य
महिला, विद्यार्थिनी, युवती कर्नाटकाची रहिवासी असावी.
राज्यभरातील सगळ्या साध्या बसमधून मोफत प्रवास.
कंडक्टर प्रवासी महिलांना शून्य रुपयांचे गुलाबी तिकीट देणार.
राज्यभरात कुठेही प्रवास करण्याची सवलत. दिवस-रात्र कितीही वेळा लाभ घेऊ शकतात. रात्रीही सवलत कायम.
तीन महिन्यांत शक्ती स्मार्ट कार्ड मिळवणे आवश्यक. त्यासाठी सेवा सिंधू वेबसाईटवर अर्ज करावा.
ऐरावतसह आराम बस आणि वातानुकूलित बसमध्ये ही सवलत नाही.
तिकिटाची रक्कम शून्य
प्रत्येक बसमधून प्रवास करणारे एकूण प्रवासी आणि महिला प्रवाशांची अचूक माहिती मिळण्यासाठी विशेष शून्य रकमेचे तिकीट तयार करण्यात आले आहे. बसमध्ये पुरुष प्रवाशांप्रमाणे महिला प्रवाशांनाही तिकीट दिले जाईल. त्यामध्ये महिला प्रवाशांनी कोणत्या ठिकाणाहून प्रवास केला, हा तपशील तिकिटासाठी महिला प्रवाशांना कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. मात्र, तिकीट काढणे बंधनकारक आहे.