बंगळुरू : विधानपरिषदेच्या तीन जागांसाठी ३० जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसने माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्यासह तिघांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसचे मुख्य सचिव मुकुल वासनिक यांनी सोमवारी यासंबंधीचे पत्रक प्रसिद्ध केले आहे. पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे तिन्ही उमेदवार मंगळवारी अर्ज दाखल करतील.
माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना पक्षाने तिकिटही दिले होते. मात्र, भाजपचे उमेदवार महेश टेंगिनकाई यांच्याकडून त्यांना पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे काँग्रेसने त्यांना विधानपरिषदेवर निवडून आणण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शेट्टर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मंत्री एन. एस. बोसराजू आणि तिप्पण्णप्पा कमकनूर यांनाही उमेदवारी जाहीर केली आहे. बोसराजू हे विधिमंडळाच्या कोणत्याही सभगृहाचे समस्य नाहीत. त्यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना सहा महिन्यात कोणत्याही एका. सभागृहाचा सदस्य बनने अनिवार्य आहे. त्यामुळे त्यांना विधानपरिषदेवर निवडून आणले जात आहे.