
मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्स संवाद
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्यात पूल पाण्याखाली जातात. त्यामुळे जनतेच्या हितासाठी कायमस्वरूपी पर्यायी मार्ग बांधण्याच्या शक्यतेचा आढावा घेऊन अहवाल पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
राज्यातील हवामान आणि पावसावर अवलंबून असलेल्या पिकांबाबत त्यांनी आज बुधवारी (26 जुलै) सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.
दरवर्षी 30 निम्न पातळीचे पूल बुडत असल्याने कायमस्वरूपी पर्यायी बांधकाम करणे उचित ठरते. त्यामुळे हे तपासून सविस्तर अहवाल पाठवा. त्याचा आढावा शासनस्तरावर घेतला जाईल, असे ते म्हणाले.
कृष्णा, मलप्रभा, घटप्रभा, भीमा या प्रमुख नद्यांच्या परिसरात अधिक दक्षता घ्यावी. कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून खबरदारी घ्यावी, असे ते म्हणाले.
अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीत मानवी जीवितहानी टाळण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांनी तातडीने सर्व प्रकारच्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.
धोक्याची पातळी ओलांडून वाहणाऱ्या नद्या आणि धोकादायक ठिकाणे ओळखून त्याबाबत लोकांना जागरूक केले पाहिजे. याशिवाय लोकांना धोकादायक ठिकाणी जाण्यापासून प्रतिबंधित करू शकतात, असे ते म्हणाले.
महसूल, ग्रामविकास आणि पोलिसांसह संबंधित विभागांनी समन्वयाने काम केल्यास मानवी जीवितहानी कमी करणे शक्य होणार आहे.दरवर्षी पाण्यात बुडणाऱ्या नदीकाठच्या गावांचे कायमस्वरूपी स्थलांतर करण्याची कार्यवाही करावी, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta