कारवार : बुधवारी कर्नाटकातल्या उत्तर कन्नड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. मोबाईल चार्जिंग सॉकेटचा करंट लागून एका आठ महिन्याच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. जिल्ह्यातल्या कारवार तालुक्यातील सिद्धर येथील ही घटना आहे. या अपघाताने परिसरातील नागरिक हादरले आहेत.
खेळता-खेळता चार्जरची पिन तोंडात घातली
झाले असे की, सिद्धर येथील संतोष कलगुटकर आणि संजना कलगुटकर यांच्या घरात मोबाइल चार्जर सॉकेट प्लग इन केले होते. मात्र कुटुंबातील सदस्यांनी त्याचा पॉवर सप्लाय बंद केला नाही. दुर्दैवाने, त्यावेळी शेजारी खेळणाऱ्या त्यांच्या 8 महिन्यांच्या चिमुरडीने खेळता-खेळता चार्जरची पिन तोंडात घातली. त्याचवेळी तिला विजेचा जोरदार धक्का बसला आणि ती मुलगी जोरात किंचाळली. तिचा आवाज ऐकताच कुटुंबीय धावत आले. त्यांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ते अयशस्वी झाले. बुधवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेत संतोष कलगुटकर आणि संजना कलगुटकर यांची आठ महिन्यांची मुलगी सानिध्या कलगुटकर हिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मुलीचे वडील बेशुद्ध पडले
या प्रकरणी पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे. अपघातानंतर मुलीला तात्काळ जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मुलीच्या मृत्यूची बातमी समजताच वडील संतोष कलगुटकर यांना मोठा धक्का बसला. ते अचानक बेशुद्ध पडले. कलगुटकर यांना तातडीने सिद्दर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
संतोष कलगुटकर हे हेस्कॉममध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. सानिध्या ही त्यांचे तिसरे अपत्य होती. आज त्यांच्या दुसऱ्या एका मुलीचा वाढदिवस होता. त्यामुळे सर्वजण आनंदात होते. दरम्यान ही दुःखद घटना घडली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.