बागलकोट : कर्नाटक सरकारच्या मुजोरीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बागलकोट शहरात एका ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा मूर्ती हटवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेने स्थानिकांमधून सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बागलकोट शहराजवळ असलेल्या कांचना पार्क येथील जागेत छत्रपती शिवरायांची 18 फूटी अश्वारुढ मूर्ती चार दिवसांपूर्वी दि. 13 ऑगस्ट रोजी बसवण्यात आली होती. मात्र कर्नाटक सरकारकडून रातोरात मूर्ती हटवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्नाटक सरकारने अर्ध्या रात्रीत कडक पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने हा मूर्ती हटवली. या प्रकाराने स्थानिक शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मूर्ती ज्या ठिकाणी बसवली होती ती जागा सध्या बागलकोट नगरपरिषदेच्या ताब्यात आहे. त्या ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता मूर्ती बसवण्यात आल्याची अफवा पसरली. तसेच नगरपरिषदेचे कर्मचारी बसवलेली मूर्ती रिकामी करणार असल्याच्या बातम्या जोरात पसरू लागल्या. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजप आणि हिंदू कार्यकर्त्यांनी दि. 14 ऑगस्ट रोजी सकाळी नगरपरिषदेत जाऊन आंदोलन केले. त्यांनी आयुक्तांशी वाद घालत कोणत्याही कारणास्तव मूर्ती काढू नका, असा इशारा दिला. मात्र बागलकोटचे जिल्हाधिकारी एम. जानकी यांनी केवळ शिवाजी मूर्ती हटविण्याचे आदेश दिले नाहीत तर शहरात कलम 144 लागू करून मनाई आदेश लागू केला. आदेशानुसार पोलीस कर्मचाऱ्यांनी सायंकाळी मार्च काढून मूर्ती असलेल्या कांचना पार्क ठिकाणचा रस्ता बंद केला व रात्री दहा वाजता नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात मूर्ती काढली.
मूर्ती हटवण्याच्या कारवाईला विरोध करणाऱ्या भाजपच्या 15 नेत्यांना आणि काही हिंदू कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि नंतर सोडून दिले. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजप सदस्यांनी गुरुवारी पुढील संघर्षाच्या योजनांवर चर्चा केली. गेल्या चार दिवसांपासून बागलकोटमध्ये शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या मुद्द्यावरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.