बंगळूर : काँग्रेसच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकारची महत्त्वाकांक्षी गृहलक्ष्मी योजना बुधवारी १३ हजार ठिकाणी एकाच वेळी सुरू होणार आहे. म्हैसूर येथील मुख्य कार्यक्रमात दक्षिण कर्नाटकातील पाच जिल्ह्यांतील १.१ लाखांहून अधिक महिला लाभार्थी सहभागी होतील.
म्हैसूर येथील मुख्य कार्यक्रमात अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, काँग्रेस नेते राहूल गांधी, मुख्यमंत्री सिध्दरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह अनेक मंत्री व आमदार सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे राज्याच्या विविध ठिकाणी थेट प्रसारण करण्यात येणार आहे.
म्हैसूर येथील महाराजा कॉलेज ग्राऊंडवर कार्यक्रमासाठी लाभार्थ्यांना आणण्यासाठी केएसआरटीसी एक हजार ८०० बसेस उपलब्ध करून देत आहे, ज्यामुळे दक्षिणेकडील जिल्ह्यांतील बससेवेवर परिणाम होऊ शकतो.
महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, म्हैसूर, हसन, चामराजनगर, कोडगु आणि मंड्या जिल्ह्यातील लाभार्थी म्हैसूरमधील उद्घाटन कार्यक्रमात सामील होतील तर इतर राज्यभरातील १३ हजार ठिकाणी उत्सवात सामील होतील.
या योजनेंतर्गत कुटुंबातील महिला प्रमुखाला दरमहा दोन हजार रुपये मिळणार आहेत. काँग्रेस आघाडी सरकारची ही चौथी हमी योजना आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आशा आणि अंगणवाडी सेविकांना पाच जिल्ह्यांतील महिला लाभार्थ्यांना म्हैसूरमध्ये आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
प्रत्येक पंचायतीला लाभार्थ्यांना म्हैसूरला नेण्यासाठी एक किंवा दोन केएसआरटीसी बसेस पाठवल्या जातील, असे सूत्रांनी सांगितले.
केएसआरटीसी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारपर्यंत या योजनेच्या शुभारंभासाठी एक हजार ८०० बसेस आरक्षित करण्यात आल्या आहेत. पाच जिल्ह्यांतील प्रत्येक पंचायतीला बुधवारी सकाळी बस मिळणार आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरुवातीच्या ठिकाणी नाश्ता दिल्यानंतर लाभार्थी म्हैसूर येथे पोहोचतील.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाभार्थींना राज्य सरकारकडून संदेश मिळेल याची खात्री करण्यासाठी काँग्रेस सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्तरावर नेटवर्क करेल.
सर्व ग्रामपंचायती आणि शहर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लाभार्थ्यांच्या उपस्थितीत ही योजना सुरू केली जाईल, जेणेकरून ते काँग्रेस सरकारच्या सामाजिक क्षेत्रातील योजनांचा लाभ घेतील, असे काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta