बेंगळुरू : अवैधपणे साठा करून विदेशात विकण्याचा प्रयत्न करताना बेंगळूर सीसीबी पोलिसांनी रक्तचंदनाचा मोठा साठा ताब्यात घेतला. त्याची सुमारे 4.5 कोटी रुपये किंमत होते. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. कम्मनहळ्ळीचे आनंद कुमार (वय 51) आणि अनिल सिंग (वय 47) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या रक्तचंदनाच्या ओंडक्यांचे वजन सुमारे 913 किलो होते.
गोट्टीगेरे मुख्य रस्त्यावरून एक जुनी कार संशयास्पदरित्या जात असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी तिला अडविले व तपासणी केली. तपासणी केल्यावर त्यांना कारच्या सीटखाली लाकडी ओंडके भरलेले आढळले. अटक केलेल्या संशयित आरोपींची चौकशी केली असता, अन्य आरोपींच्या मदतीने त्यांनी रक्तचंदनाचे ओंडके आंध्रप्रदेश येथील चित्तूर येथून चोरून आणल्याची माहिती उघड झाली. समुद्र मार्गाने ते विदेशात विक्रीसाठी पाठविणार होते, असे त्यांनी सांगितले.
आरोपींनी बन्नेरघाट रोडवरील होमदेवनहळ्ळीजवळ एक गोदाम भाड्याने घेतले होते. तेथे त्यांनी रक्तचंदनाचा साठा केला होता. सॅम्पल लाकडी ओंडके ग्राहकांना दाखवण्यासाठी ते गाडीतून घेऊन जात होते. गोदामावर छापा घालून 4.5 रुपये किमतीची रक्तचंदनाची लाकडे ताब्यात घेतली आहेत.
