दांडेली : उत्तर कन्नड जिल्ह्यातील दांडेली तालुक्यातील एका खाजगी शाळेत विद्यार्थिनींच्या गटाने एकत्रितपणे हाताची नस कापून घेऊन सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली.
9वी आणि 10वीत शिकणाऱ्या 9 विद्यार्थिनींच्या डाव्या हाताच्या खालच्या भागात धारदार शास्त्राने जखम झाल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थ्यांच्या हातावर 10-15 जखमा आढळून आल्या. त्या जखमा पाहून विद्यार्थ्यांचे पालक घाबरले आणि त्यांनी पोलिसांच्या निदर्शनास सदर बाब आणून दिली. आणि लागलीच शाळेतील शिक्षकांनाही कळविण्यात आले. विद्यार्थ्यांना विचारले असता त्या वेगवेगळी कारणे देत आहेत. मुख्याध्यापकांनाही विद्यार्थी नीट उत्तर देत नसल्याचे बोलले जाते.
या विचित्र प्रकाराने पालक हैराण झाले असून, या घटनेचे कारण समोर यावे, अशी मागणी पालकांनी केली आहे. या विद्यार्थिनींनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय आहे. या घटनेचे मुख्य कारण तपासानंतर कळणार आहे.