
बेळगाव : सरकारी तसेच अनुदानित शाळांमधील सहामाही परीक्षा अंतिम टप्प्यात असून येत्या सोमवार दि. 9 पासून दसरा सुटीला सुरुवात होणार आहे. दि. 9 ते 24 ऑक्टोबरदरम्यान सरकारी शाळांना दसरा सुटी देण्यात येणार आहे. यावर्षी घटस्थापनेपूर्वी एक आठवडा विद्यार्थ्यांना दसरा सुटी मिळणार असल्याने दसऱ्याच्या तयारीला वेळ मिळणार आहे. कर्नाटकात दसरोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. विशेषत: दक्षिण कर्नाटकात म्हैसूर परिसरामध्ये पारंपरिक पद्धतीने दसरा साजरा केला जात असल्याने यादरम्यान शाळा, महाविद्यालयांना सुटी दिली जाते. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच शिक्षण विभागाकडून वर्षभराचे वेळापत्रक जाहीर केले जाते. सहामाही परीक्षा, त्यानंतर दसऱ्याची सुटी असे नियोजन केले जाते. प्राथमिक विभागाच्या सहामाही परीक्षांना मंगळवार दि. 3 पासून सुरुवात झाली. तर माध्यमिक विभागाच्या परीक्षा 29 सप्टेंबरपासून सुरू झाल्या आहेत. प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या परीक्षा शनिवार दि. 7 रोजी संपणार आहेत. त्यानंतर दसऱ्याच्या सुटीला सुरुवात होईल. सोमवार दि. 9 ते मंगळवार दि. 24 ऑक्टोबरपर्यंत दसऱ्याची सुटी जाहीर करण्यात आली आहे. सीमोल्लंघनाच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थी तसेच शिक्षकांना शाळेवर हजर रहावे लागणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta