
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर निर्णय
बंगळूर : आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून प्रदेश काँग्रेसची पुनर्रचना करण्याच्या हालचाली सुरू आहेत. केपीसीसीसाठी नवीन कार्याध्यक्षासह नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव नेत्यांनी मांडला आहे.
पुढील लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केलेल्या काँग्रेस पक्षाने निवडणुकीत अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी स्वत:ची रणनीती आखली असून, त्यानुसार केपीसीसीनेही पुनर्रचनेसाठी पावले उचलली आहेत.
केपीसीसीचे विद्यमान कार्याध्यक्ष असलेले ईश्वर खांड्रे, सतीश जारकीहोळी, रामलिंग रेड्डी हे मंत्री असून, त्यांना निवडणुकीत अधिक जबाबदारी देण्याचा निर्णय वरिष्ठांनी घेतला आहे.
ज्येष्ठांच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर कार्याध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून, माजी मंत्री विनय कुलकर्णी, विनयकुमार सोरके, माजी आमदार अंजली निंबाळकर खासदार जे. सी. चंद्रशेखर आणि ज्येष्ठ नेते वसंतकुमार यांची नावे झळकत आहेत.
विविध जाती-जमाती लक्षात घेऊन नवीन कार्याध्यक्ष नेमण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सध्या विनय कुलकर्णी, अंजली निंबाळकर, जे. सी. चंद्रशेखर, विनयकुमार सोरके, वसंतकुमार यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती होण्याची शक्यता अधिक आहे.
पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष बदलणार
नवीन कार्याध्यक्षांसोबतच केपीसीसीसाठी नवीन उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि सचिवांचीही नियुक्ती करण्यात येणार आहे. विविध जिल्ह्यांचे अध्यक्ष बदलण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केपीसीसीची पुनर्रचना करण्यात येणार आहे. सर्व जाती-समुदायांना प्रतिनिधित्व देऊन निवडणुकीत सक्रिय करण्यासाठी रणनीती आखण्यात येत आहे.
दसऱ्यानंतर निगम व महामंडळाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या नियुक्तीसोबतच केपीसीसीमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात येणार असल्याचे काँग्रेसच्या उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
विविध निगम, महामंडळाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी आमदार आणि महत्त्वाच्या कार्यकर्त्यांच्या नियुक्तीबाबत चर्चा झाली. गेल्या आठवड्यात दिल्लीत गेलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महामंडळाच्या अध्यक्षांची यादी वरिष्ठांना सादर केली.
Belgaum Varta Belgaum Varta