
म्हैसूर दसरा महोत्सवाची आज सांगता; ‘एअर शो’ला मोठा प्रतिसाद
बंगळूर : जगप्रसिद्ध जंबो सवारीची उलटी गिणती सुरू झाली आहे आणि सांस्कृतिक म्हैसूर शहर त्यासाठी सज्ज झाले आहे. मंत्रमुग्ध करणारे दृश्य पाहण्यासाठी लोक आतुरतेने प्रतिक्षा करीत आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या उद्या दुपारी १:४६ ते २:०८ या वेळेत राजवाड्याच्या गेटजवळ नंदीध्वज पूजन करतील. नंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजवाड्याच्या आवारात दुपारी ४.४० ते ५ या वेळेत विजयादशमी मिरवणूकीला चालना देतील.
दरम्यान, आज झालेल्या चित्तथरारक ‘एअर शो’ला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
कॅप्टन अभिमन्यू ७५० किलो वजनाची सुवर्ण अंबारी घेऊन देवी चामुंडेश्वरी देवीच्या मुर्तीला घेऊन बन्निमंडपच्या परेड मैदानावर पोहोचेल. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, म्हैसूरचे राजे वंशज यदुवीर कृष्णदत्त चामराज वडेयर, मंत्री महादेवप्पा, व्यंकटेश, शिवराज तंगडगी आणि इतर मान्यवर या अद्भूत शोभायात्रेत सहभागी होणार असून आमदार श्रीवत्स हे अध्यक्षस्थानी असतील.
संध्याकाळी बन्निमंडप, म्हैसूर येथे एक मंत्रमुग्ध करणारी परेड होईल. सायंकाळी ७:३० वाजता होणाऱ्या पंजिना कवायत कार्यक्रमात राज्यपाल थावरचंद गेहलोत परेडचे निरिक्षण करतील आणि सलामी स्वीकारतील.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, शोभा करंदलाजे, म्हैसूर जिल्हा प्रभारी मंत्री महादेवप्पा आणि इतर मान्यवर सहभागी होणार असून आमदार तन्वीर सेठ अध्यक्षस्थानी असतील.
यावेळी, जंबो सवारी मिरवणुकीत युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेल्या होयसळ मंदिर, बेलूर, हळेबिडू आणि सोमनाथपुर मंदिरांच्या मॉडेलसह ४९ चलनचित्रे सहभागी होतील.
या मिरवणुकीत गोरावरा कुनीत, पट्टाडकुनीत, कराडी कुनीत, गारुडी गोंबे यांच्यासह दहा स्थानिक पथके सहभागी होऊन लोकांचे लक्ष वेधून घेतील. राजांच्या काळातील गतवैभव यावेळी जंबोसवारीच्या मिरवणुकीत पुन्हा जिवंत होणार आहे. अंबारी घेऊन जाणाऱ्या कॅप्टन अभिमन्यूच्या दिमतीला २०० लोक राजेशाही वेषात मिरवणुकीत सहभागी होतील.
एअर शोला अभूतपूर्व प्रतिसाद
म्हैसूर दसरा महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या एअर शोला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. एअर शोला प्रेक्षकांची मोठी गर्दी होती.
दसरा उत्सवाचा एक भाग म्हणून बन्नीमंटप येथे संध्याकाळी आयोजित केलेला एअर शो पाहण्यासाठी हजारो लोक येत असल्याने बन्नीमंटप मैदानाभोवती सुमारे पाच किमीपर्यंत वाहने थांबली होती. मैदानाला जोडणाऱ्या एलआयसी सर्कल आणि हायवे सर्कल येथील रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रविवारी एअर शोचा सराव झाला तेव्हाही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. काल मोफत प्रवेश देण्यात आला. आज प्रदर्शन पाहण्यासाठी पास अनिवार्य करण्यात आल्याने गर्दी वाढली.
लक्ष वेधी मेटल बर्ड्सची तालीम
रविवारी एअर शोची तालीम (रिहर्सल) झाली. यावेळी विविध प्रकारच्या धातूच्या पक्ष्यांनी स्टंटबाजी करून रसिकांचे लक्ष वेधून घेतले. भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरणसह अनेक लढाऊ विमानांनी आकाशात स्टंटबाजी केल्याने उपस्थित जनसमुदाय मंत्रमुग्ध झाला. एअर शोची रिहर्सल पाहण्यासाठी शेकडो लोक आले होते. २०१९ मध्ये म्हैसूरमध्ये दसऱ्याचा एक भाग म्हणून एअर शो आयोजित करण्यात आला होता. आता चार वर्षांनंतर होणारा एअर शो पाहण्यासाठी लोक उत्सुक होते.
Belgaum Varta Belgaum Varta