राज्याच्या राजकारणात खळबळ, बेळगावच्या राजकारणात शिवकुमाराची ढवळाढवळ नाही
बंगळूर : उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मंगळवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेतली व चर्चा केली. जारकीहोळी हे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. क्रिसेंट रोडवरील सतीश जारकीहोळी यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीमुळे राज्याच्या राजकारणात विशेषत: काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.
बैठक संपल्यानंतर लगेचच शिवकुमार नवी दिल्लीला रवाना झाले. जारकीहोळी यांनी यापूर्वी बेळगाव येथील त्यांच्या गृहजिल्ह्यात शिवकुमार यांच्या हस्तक्षेपावर आक्षेप व्यक्त केला होता. जिल्ह्यातील जारकीहोळी कुटुंबाच्या वर्चस्वाला आव्हान देणाऱ्या लिंगायत नेत्या म्हणून उदयास येत असलेल्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना शिवकुमार यांनी दिलेले महत्त्व आणि पाठिंबा पाहून सार्वजनिक बांधकाम मंत्री नाराज झाले.
अलिकडेच शिवकुमार बेळगावात आले असता सतीश जारकीहोळी त्यांच्या स्वागत कार्यक्रमापासून दूर राहिले. तसेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या रात्रीच्या डीनरपार्टीला अनुपस्थित राहिले. या घडामोडीने मोठी खळबळ उडाली. जारकीहोळी म्हणाले होते की, मी २०२८ मध्ये मुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहे.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना जारकीहोळी यांनी शिवकुमार यांच्याशी पक्ष संघटना, लोकसभा निवडणूक आणि जिल्हाध्यक्ष बदलाबाबत चर्चा केली. त्याशिवाय अन्य कोणत्याही विषयावर चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र या भेटीतून शिवकुमार यांना मंत्री जारकीहोळी यांच्याशी असलेल्या तक्रारी दूर करायच्या असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी पक्ष संघटनेबाबत चर्चा करण्यासाठी शिवकुमार नवी दिल्लीत गेल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवकुमाराचा हस्तक्षेप नाही
सतीश जारकीहोळी म्हणाले, आमच्या चर्चेत बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. बेळगाव जिल्हास्तरावर काही समस्या आहेत. त्या आम्ही स्थानिक पातळीवर सोडवू. बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्र्यांनी ढवळाढवळ केली नाही. याबाबत त्यांच्याशी चर्चा करण्याची गरज नाही.
प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छुक नाही
माझे नाव प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही. मी इच्छुकही नाही. माझ्या क्षमतेनुसार कामाचा ताण आहे. मी त्यांना सामोरे जाईन. लांबचा प्रवास करावा लागतो. ट्रॅकवर यायलाच हवे. तोपर्यंत मी जबाबदारी सांभाळेन. सध्या आमची गाडी सुरळीत चालली आहे, असे त्यांनी आपल्या शैलीत सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta