बंगळूर : दिवाळीनंतर १५ नोव्हेंबरला धजद – भाजपचे काही आमदार काँग्रेस पक्षात सामील होतील, असे स्फोटक विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आज दिल्लीत केले.
दिल्ली दौऱ्यावर असलेले शिवकुमार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले की, दिवाळीनंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडतील. भाजप आणि धजदचे आमदार आमच्या संपर्कात आहेत. १५ नोव्हेंबरला आमच्या पक्षात आणखी नेते सामील होतील, असे सांगून त्यांनी ‘ऑपरेशन हस्त’ चे संकेत दिले. ते म्हणाले, “राज्यातील सध्याच्या परिस्थितीत भाजप आमच्या एका आमदारालाही फोडू शकत नाही. भाजपला नेतृत्वाबाबतही कोणताच निर्णय होऊ शकलेला नाही. भाजप संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपमध्येच अनेक समस्या आहेत. आणि आमच्या आमदारांना फोडणे तर दूरच आहे. भाजप अस्तित्वासाठी झगडत आहे. महाराष्ट्रात झालेल्या बैठकीबद्दल बोलत नाही. सर्वकाही माहीत आहे. ”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेबाबत ते म्हणाले की, पंतप्रधानांना आमची आठवण येते याचा आनंद आहे. आमची हमी, आमची एकजूट, जनतेच्या निर्णयाने त्यांची झोप उडाली आहे. ते आमच्याही स्मरणात राहतील, अशी टीका त्यांनी केली.
ऑपरेशन नाही, पक्ष प्रवेश – सिध्दरामय्या
‘ऑपरेशन हस्त’ मध्ये आमचा पक्ष सहभागी नाही, असे ठासून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी सांगितले की, भाजप आणि धजदचे अनेक आमदार, नेते आणि कार्यकर्ते आगामी काळात स्वेच्छेने काँग्रेसमध्ये सामील होतील. सत्ताधारी पक्षाच्या कोणत्याही दबावाला बळी न पडता भाजप आणि धजदमधील विद्यमान आमदार, माजी आमदार, नेते आणि कार्यकर्ते यांच्यासह अनेकजण काँग्रेसमध्ये येत आहेत.
‘ऑपरेशन हस्त’ करण्याचा प्रश्नच येत नाही. जो कोणी पक्षात येईल, त्यांना पक्षात सामावून घेतले जाईल. जो आमच्या पक्षाची विचारधारा आणि नेतृत्व स्वीकारू शकतो त्या भाजप किंवा धजदमधील कोणालाही नाही म्हणू शकतो का? असे सिद्धरामय्या यांनी एका प्रश्नाला उत्तर दिले.
Belgaum Varta Belgaum Varta