बेंगळुरू : विधानसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांनी अखेर कर्नाटक भाजपला प्रदेशाध्यक्ष लाभला आहे. येडियुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्याची घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज सायंकाळी उशिरा दिल्लीमध्ये केली.
अलीकडेच भाजपच्या आमदारांनी प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा विरोधी पक्ष नेता निवडला नाही तर आम्ही बेळगाव अधिवेशनाला जाणार नाही असा पवित्रा घेऊन पक्षनेतृत्वाला कडक संदेश पाठवला होता. त्याची दखल अखेर भाजप हायकमांडला घ्यावी लागली. दिल्ली येथे आज शुक्रवारी सायंकाळी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी अखेर कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्षपदी बी. वाय. विजयेंद्र यांच्या नियुक्तीची घोषणा केली. निवडीनंतर विजयेंद्र यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. सध्या भाजपचे राज्य उपाध्यक्षपद सांभाळत असलेले विजयेंद्र माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे पुत्र आहेत. या नियुक्तीनंतर येडियुरप्पा यांनी कर्नाटक भाजपवरील आपली पकड पुन्हा सिद्ध केल्याचे राजकीय वर्तुळात मानण्यात येत आहे.