काँग्रेस प्रवेशाची चर्चा; भाजपकडून गंभीर दखल
बंगळूर : बेळगावात काल रात्री उशिरा झालेल्या काँग्रेस आमदारांच्या डिनर पार्टीत भाजप आमदारांच्या सहभागावरून राजकीय दृष्ट्या वेगवेगळे अन्वयार्थ लावले जात आहेत. पार्टीत उपस्थित तीन आमदार काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा असून प्रदेश भाजपनेही याची गंभीर दखल घेतली आहे.
बेळगाव शहराच्या हद्दीतील एका खासगी रिसॉर्टमध्ये काल रात्री काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर आमदारांसाठी डिनर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या डिनरमध्ये भाजपचे आमदार एस. टी. सोमशेखर, शिवराम हेब्बार आणि विधान परिषद सदस्य एच. विश्वनाथ यांनी काँग्रेस आमदारांच्या डिनर पार्टीत सहभाग घेतल्याने राजकीयदृष्ट्या विविध अर्थ काढले जात आहेत. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर ते काँग्रेसमध्ये जाणार हे निश्चित आहे.
काँग्रेसच्या आघाडी सरकारच्या काळात एस. टी. सोमशेखर, शिवराम हेब्बार आणि धजदचे एच. विश्वनाथ यांनी ऑपरेशन कमलमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि युतीचे सरकार स्थापन केले.
भाजप सरकारमध्ये एस.टी. सोमशेखर आणि शिवराम हेब्बार हे मंत्री होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होऊन काँग्रेसची सत्ता आल्यावर भाजपकडून विजयी झालेले हे दोघे पुन्हा काँग्रेसकडे झुकत आहेत.
भाजपमध्ये योग्य वागणूक दिली जात नसल्याचे सांगून ते नाराज होऊन काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. या सगळ्यात भाजपने अधिवेशन काळात केलेल्या आंदोलनात एस. टी. सोमशेखर, शिवराम हेब्बार यांचा सहभाग नव्हता. आता, अधिवेशनादरम्यान झालेल्या डिनर पार्टीत त्यांचा सहभाग असल्याने त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित मानण्यात येत आहे.
बैठकीला नाही, पार्टीला उपस्थित
भाजप आमदार एस. टी. सोमशेखर शिवराम हेब्बार बैठकीला उपस्थित नव्हते, परंतु ते भोजन कार्यक्रमाला उपस्थित होते, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले.
डिनर पार्टीसाठी एस. टी. सोमशेखर, शिवराम हेब्बार, विश्वनाथ यांच्यासह अन्य पक्षांचे दहा आमदार आले होते. ते कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला आले नाहीत. ते आमच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीला का येतील, ते आमच्या पक्षाचे आमदार नाहीत, असे ते म्हणाले. आमच्या निमंत्रणावरून केवळ मेजवानीच्या बैठकीला ते आले होते, असे ते म्हणाले.
शिस्तीचे उल्लंघन नाही : आर. अशोक
काँग्रेस आमदारांच्या भोजन सभेला भाजपचे आमदार एस. टी. सोमशेखर आणि शिवराम हेब्बार यांचा सहभाग हा पक्षशिस्तीचा भंग नाही. त्यानी जेवायला बोलावलं आणि ते उपस्थित राहीले. याबाबत एस. टी. सोमशेखर माझ्याशी बोलले होते, जे आश्चर्यकारक होते, असे अशोक म्हणाले.
डिनरला उपस्थित असलेल्या हेब्बार आणि विश्वनाथ यांच्याशीही मी बोलेन. गेल्या तीन महिन्यांपासून अशा घटना सुरू आहेत. सगळं बोलून ठरवू. डिनर पार्टीला उपस्थिती शिस्त भंग म्हणणं चुकीचं ठरेल, असे अशोक म्हणाले.
——————————————————————-
“मला आज सकाळी याबद्दल माहिती मिळाली. ही गंभीर बाब आहे. मी आजच त्यांच्याशी बोलणार आहे. त्यांचा यामागे काय हेतू आहे, याची विचारणा करू.
… बी. वाय. विजयेंद्र, भाजप प्रदेशाध्यक्ष