धजदची सात जागांची मागणी; देवेगौडा, कुमारस्वामींची पंतप्रधान मोदींशी चर्चा
बंगळूर : आगामी लोकसभा निवडणुकीत युती करण्याचा निर्णय घेतलेल्या धजद आणि भाजप यांच्यातील जागावाटप प्रक्रिया आज जवळपास अंतिम झाली. भाजप नेते लोकसभेच्या चार जागा धजदला देण्यास इच्छुक आहेत. दरम्यान धजदचे अध्यक्ष व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा व माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली.
लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी धजदचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि धजदचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी काल दिल्लीला रवाना झाले होते. आज सकाळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी जागावाटपासह सर्व राजकीय मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली असून पुढील लोकसभा निवडणुकीत धजदला चार मतदारसंघ देण्याचे पंतप्रधान मोदींनी मान्य केल्याचे सांगण्यात येत आहे.
माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आज संध्याकाळी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन चर्चा केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करून सर्व गोष्टींना अंतिम रूप देण्यात येणार असल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.
देवेगौडा आणि कुमारस्वामी यांनी पंतप्रधान मोदी यांची संसद भवनातील पंतप्रधान कार्यालयात भेट घेऊन सर्व गोष्टींवर चर्चा केली. माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी लोकसभा निवडणुकीत धजदला सात जागा सोडाव्यात, अशी मागणी केली होती. मात्र, भाजप नेत्यांनी धजदला चार जागांवर उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली आहे.
माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी हसन, मंड्या, तुमकूर, चिक्कबळ्ळापूर, कोलार, म्हैसूर आणि बंगळुर ग्रामीण मतदारसंघ या सात जागा धजदला सोडण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र भाजप नेत्यांनी चारच जागा सोडण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. अखेर गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा केल्यानंतर अधिकृत निर्णय जाहीर केला जाईल. भाजपने हसन, मंड्या, चिक्कबळ्ळापूर आणि बंगळुर ग्रामीण या चार जागा धजदला देण्याची तयारी दर्शविली आहे. इतर ठिकाणी भाजप आपले उमेदवार उभे करणार आहे. जुन्या म्हैसूरमध्ये धजद मजबूत असल्याने त्या भागातील जागा धजदला सोडून इतर भागांमध्ये भाजपचे उमेदवार उभे करून किमान २० जागा जिंकण्याची रणनीती भाजपने आखली आहे.
भाजप-धजद युतीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्रही काल दिल्लीत गेले आहेत. कुमारस्वामी यांच्या युतीच्या चर्चेआधी ज्येष्ठ मंडळी विजयेंद्र यांच्याशी स्वतंत्र चर्चा करतील आणि धजदला कोणते मतदारसंघ द्यावेत यावर अंतिम निर्णय घेतील, असे सूत्रांनी सांगितले.
विजयेंद्र म्हणाले की, पक्ष संघटनेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीत आलो आहे. मला भाजप-धजद युतीच्या चर्चेची माहिती नाही. जागा वाटपाबाबत भाजप श्रेष्ठींशी आपण चर्चा करणार असल्याचे सांगून एकंदर परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आनणार असल्याचे ते म्हणाले.
जागा वाटपाबाबत संभ्रम नाही – कुमारस्वामी
भाजप आणि धजद पक्षांमध्ये जागावाटपाबाबत कोणताही संभ्रम नाही. आम्ही जितक्या जागा जिंकू तितक्या जागा आम्ही भाजपकडे मागू. जागांच्या वाटपावर लवकरच अंतिम निर्णय होईल, असे ते म्हणाले.
दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आम्हाला अनुकूल असलेल्या मतदारसंघांचा अहवाल आमच्याकडे आहे. त्या अहवालानुसार निवडणुकीचे काम करू. जागावाटप हा महत्त्वाचा मुद्दा नाही, या मुद्द्यावर कोणताही गोंधळ नाही, असे ते म्हणाले.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी जागा वाटपाबाबत चर्चा करून सर्व गोष्टींना अंतिमरूप देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही. मी कर्नाटकात राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले. निखिल कुमारस्वामी देखील लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, निवडणुकीचा प्रचार करतील, निखिल दोनदा निवडणूक हरला आहे हे खरे आहे. मात्र निखिलला उमेदवारी देण्याबाबत पक्षाने निर्णय घेतलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदींची आम्ही आज भेट घेतली. त्यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. मोदींना माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्याबद्दल आदर आहे. आमच्या कुटुंबावर असलेला विश्वास आजही कमी झालेला नाही, असे ते म्हणाले.
कर्नाटकातही शिंदे, पवार
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील काँग्रेसचे सरकार पडू शकते का, या प्रश्नाला उत्तर देताना कुमारस्वामी म्हणाले की, कर्नाटकच्या राजकारणात शिंदे आणि अजित पवार आहेत. कुमारस्वामी भविष्यात केंद्रीय मंत्री होतील का, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, कोणाच्या कपाळावर काय लिहिले आहे ते मला माहीत नाही. राजकारणात काहीही होऊ शकते. अलीकडेच काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर नवखे मुख्यमंत्री झाले, त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकते, असे त्यांनी उपरोधिकपणे सांगितले.