बंगळूर : राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्यावरील बंदी मागे घेण्याबाबत सरकार विचार करत असून सरकारी पातळीवर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी सांगितले.
मुख्यमंत्री म्हैसूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. या शैक्षणिक वर्षातच हिजाबवरील बंदी उठवली जाईल का या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, “आम्ही अद्याप हिजाब घालण्यावरील निर्बंध मागे घेतलेले नाहीत. मी एका प्रश्नाला उत्तर देत होतो जेव्हा मी म्हणालो की आम्ही हिजाब घालण्यावरील निर्बंध उठवण्याबाबत विचार करत आहोत. आम्ही त्यावर चर्चा करू आणि नंतर त्यास अंतिम रूप देऊ,” असे ते म्हणाले.
याआधी शुक्रवारी मुख्यमंत्री म्हणाले होते, “आम्ही सर्व पक्ष आणि सर्व समुदायातील गरीब लोकांना मदत करतो, मग ते शीख, ख्रिश्चन, मुस्लिम असोत. ‘सबका साथ सबका विकास’ म्हणत असतानाही भाजपने लोकांना कपडे, हिजाब, बुरखा, टोपी आणि दाढी ठेवण्यावरही प्रतिबंध केला आहे. आम्ही हिजाब घालण्यावरील निर्बंध मागे घेणार आहोत. यापुढे त्यावर कोणतेही बंधन नाही, असे ते घालू शकतात.”
सिद्धरामय्या पुढे म्हणाले, “मी अधिकार्यांना हिजाब घालण्यावरील निर्बंधाचा आदेश मागे घेण्यास सांगितले आहे. कपडे घालणे आणि खाणे ही व्यक्तीची वैयक्तिक निवड आहे, मी का निर्बंध घालू? तुम्ही तुमच्या आवडीचे कपडे घाला, तुम्ही तुमच्या आवडीचे अन्न खा. मला त्याचा त्रास आहे का? मी माझ्या आवडीनुसार जेवण खाईन आणि माझ्या आवडीनुसार मी ‘धोती किंवा ‘जुब्बा’ घालेन. भाजप मतांसाठी खोटे बोलत आहे. आम्ही ते करत नाही, कारण आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी आलो आहोत.”