सदानंद गौडा, यत्नाळनी व्यक्त केला असंतोष
बंगळूर : प्रदेश भाजपच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या यादीबाबत भाजपमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. नुतन पदाधिकाऱ्यांच्या यादीवरून कांही वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
प्रदेश भाजपच्या नवीन अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीबाबत आधीच नाराजी होती. आता इतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतरही भाजपमध्ये पुन्हा असंतोष आहे. माजी मुख्यमंत्री, खासदार सदानंद गौडा आणि ज्येष्ठ आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी नवीन पदाधिकाऱ्यांच्या यादीवरून मतभेद व्यक्त केले आहेत. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या निकटवर्तीयांना प्राधान्य देण्यात आल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच या दोन नेत्यांनी माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
नव्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या निकटवर्तीयांचा समावेश करण्यात आला आहे. यादी जाहीर करण्यापूर्वी केंद्रीय नेत्यांनी राज्यात येऊन कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा करायला हवे होते. वरिष्ठ नेत्यांचे मत विचारात घेऊन नवीन पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर करायला हवी होती, असे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ, ज्यांची भाजपमध्ये येडियुरप्पा विरोधी गट म्हणून ओळख आहे. त्यांनी येडियुरप्पा आणि त्यांच्या कुटुंबियांवर वेळ मिळेल तेव्हा चपराक मारली आहे. त्यांनी नवीन पदाधिकाऱ्यांची यादी पाहिली तर केजेपी – २ यादी असल्यासारखे दिसते, असा असा टोला लगावला. येडियुरप्पांचा केजेपी १ आहे, तर त्यांचा मुलगा केजेपी २ आहे, नातू पुढे आला तर केजेपी ३ होईल, असे सांगून बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी नवीन पदाधिकाऱ्यांच्या यादीवर नाराजी व्यक्त केली.
या यादीचा जीव फक्त २०२४ लोकसभेसाठी असल्याचे सांगून आश्चर्य व्यक्त केले आहे. आता राजकारणात अनेक लोभी लोक आहेत. ते सर्व हलके काम करतात. आज मूल्याधारित राजकारण नाही. सर्वच चोरटे लफंग सामील होत आहेत. ते चांगल्या लोकांना ब्लॅकमेल करतात. २०२४ च्या निवडणुकीनंतर मोठे ऑपरेशन झाले नाही तर मी पुढील निर्णय घेईन असे ते म्हणाले.
ज्येष्ठांशी चर्चा करायला हवी होती : सदानंद गौडा
नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबाबत भाष्य करताना माजी मुख्यमंत्री सदानंद गौडा यांनी नाराजी व्यक्त केली. हायकमांडने इथे येऊन निर्णय घ्यायला हवा होता. दक्षिण कर्नाटकाला अधिक प्राधान्य मिळाले आहे. उत्तर कर्नाटकातील कार्यकर्त्यांना संधी मिळाली नसल्याबद्दल तक्रार असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की, केंद्रातील नेत्यांनी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यापूर्वी स्थानिक नेत्यांशी चर्चा करायला हवी होती.
यापुढील काळात जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांची समान नियुक्ती करावी. संघ एका गटापुरता मर्यादित नसावा. आता तरी श्रेष्ठींनी राज्यात यावे. दिल्लीत बसून निर्णय घेणे योग्य नाही. कोअर कमिटीशी चर्चा करून निर्णय घेतला असता तर अधिक मजबूत संघटना उभारता आली असती, असे सांगत सदानंद गौडा यांनी वरिष्ठांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.
विधानसभा निवडणुकीनंतर हायकमांड कर्नाटककडे लक्ष देत नाही. पक्षातील अंतर्गत कलह मिटवायला हवा होता आणि असंतुष्ट लोकांना बोलावून चर्चा करायला हवी होती, असा आक्षेप व्यक्त केला. जुनी प्रथा पुन्हा सुरू राहिल्यास पक्ष संघटनेवर परिणाम होईल, असे ते म्हणाले.
असंतोष दूर होईल : येडियुरप्पा
माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा म्हणाले की, भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती सर्व गोष्टींचा विचार करून करण्यात आली आहे. निवडीवर कांही जण नाराज होणे स्वाभाविक असून भविष्यात सर्व काही ठीक होईल.
दावणगेरे येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्या वक्तव्याबाबत मी काहीही बोलणार नाही. यत्नाळ यांच्या विरोधात हायकमांडकडे तक्रार करण्याचा प्रयत्नही करणार नाही, सर्व काही ठीक होईल.
राज्यात भाजप समर्थक वातावरण आहे. विजयेंद्र प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर तरुणांमध्ये उत्साह आहे. लोकसभा निवडणुकीत २८ जागा जिंकण्याचे आमचे लक्ष्य असल्याचे ते म्हणाले.