विजयेंद्र; नूतन पदाधिकाऱ्यांची पहिली बैठक, लोकसभा निवडणुकीत एकजुटीचे आवाहन
बंगळूर : राज्यात आणि देशात भाजप समर्थक लाट असल्याचे प्रतिपादन करून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी बुधवारी कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. अशावेळी विरोधकांना हलके न घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
येथील पक्ष कार्यालयात प्रदेश शाखेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या पहिल्या बैठकीत ते बोलत होते. विजयेंद्र म्हणाले, “प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळ्या प्रकारची आव्हाने असतात. ती आव्हाने यशस्वीपणे पेलायची असतील तर विरोधकांना हलक्यात घेऊ नये. कर्नाटकात तर काँग्रेसचे सरकार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे लोकाभिमुख कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी त्यांनी पक्षाच्या सदस्यांना विनंती केली. १० नोव्हेंबरला भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त झालेले विजयेंद्र यांनी २३ डिसेंबर रोजी पक्षाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती.
मोदी सरकारच्या उपलब्धी आणि कार्यक्रमांवर प्रकाश टाकताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या योजना लोकांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करावी. प्रत्येक निवडणूक, अगदी जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुका, तसेच ब्रुहत बंगळुर महानगर पालीका (बीबीएमपी) निवडणुकीपासून ते विधानपरिषद निवडणुकांपर्यंत गांभीर्याने पाहिले पाहिजे आणि ‘आपण आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी पुढे पाऊल टाकले पाहिजे’.
ही जबाबदारी अत्यंत महत्त्वाच्या वेळी आली आहे, याकडे लक्ष वेधून ते पुढे म्हणाले, “आपण सर्वांनी जबाबदारीने वागले पाहिजे आणि आपले कर्तव्य बजावले पाहिजे. आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जबाबदारी आपल्यावर आली आहे. भाजप आणि धजद लोकसभा निवडणुका एकत्र लढतील. राज्यातील सर्व २८ जागा जिंकण्याचे पक्षाचे लक्ष्य आहे, असे विजयेंद्र म्हणाले.
सत्ताधारी काँग्रेस ‘सत्तेच्या नशेत’ असल्याचे सांगून ते म्हणाले, “काँग्रेस पक्षाला सडेतोड उत्तर देण्याबरोबरच नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला काम करावे लागेल… कर्नाटक हा केवळ भाजपचा बालेकिल्लाच नाही, तर दक्षिण भारतात हा एक सुरक्षित किल्ला आहे, हा संदेश आपल्याला द्यायचा आहे.”
भाजप कार्यकर्त्यांसमोरचे आव्हान मोठे नाही, असे सांगून विजयेंद्र म्हणाले की, देशात आणि राज्यात मोदी समर्थक वातावरण आहे आणि ते खूप लोकप्रियही आहेत. मोदींच्या लोकप्रियतेचे मतांमध्ये रूपांतर करण्यावर लक्ष केंद्रित करा आणि लगेच मार्ग काढण्याचा सल्ला त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिला.
“विश्रांती घेण्याचा प्रश्नच उद्भवू नये. पुढील लोकसभा निवडणुका संपेपर्यंत आपल्याकडे रविवारी, सणादिवशी सुध्दा सुट्टी घेऊन चालणाप नाही…”, असे ते म्हणाले.
“लोकसभा निवडणुकीचे लक्ष्य गाठेपर्यंत आपण आराम करण्याचा प्रश्नच उद्भवू नये. नरेंद्र मोदी गेली साडे नऊ वर्षे विश्रांती न घेता देशाची अखंड सेवा करत आहेत, त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. पक्षकारांना कोणत्याही जातीभेदाशिवाय, हिंदुत्वाच्या झेंड्याखाली एकसंध होऊन काम करण्याचे त्यांनी आवाहन केले.