काँग्रेसकडून अटकेचे समर्थन; निषेधार्थ भाजपचे आज राज्यव्यापी आंदोलन
बंगळूर : अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी ३१ वर्षांपूर्वी झालेल्या संघर्षात कारसेवेत सहभागी झालेल्या दोन हिंदू कार्यकर्त्यांच्या अटकेमुळे राजकीय चिखलफेक सुरू झाली आहे. राज्य सरकारने अटकेचा बचाव केला आहे, तर भाजपने या अटकेचा निषेध केला आहे. हिंदू कार्यकर्त्यांच्या अटकेवरून आता काँग्रेस आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. दरम्यान, आज (ता. ३) अटकेच्या निषेधार्थ राज्यभर निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी, जुन्या प्रकरणात अटक न करता गप्प बसायला हवे होते का, असा सवाल केला. तर सरकारच्या या कारवाईविरोधात संताप व्यक्त करत भाजपने हिंदू कार्यकर्त्यांच्या अटकेविरोधात आज (ता.३) राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचं म्हटलं आहे.
राममंदिराच्या उद्घाटनाची उलटी गिणती सुरू असतानाच दोन कारसेवकांच्या अटकेने राजकीय पेच निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी, या प्रकरणाचे राजकारण करणे योग्य नाही. या प्रकरणाला जातीय रंग देऊ नका, असे सांगून सरकारच्या कृतीचा बचाव केला.
मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी, हिंदू कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करत असताना त्यांना अटक करण्याची गरज नव्हती. सरकारची ही कृती निंदनीय असल्याचे ते म्हणाले. ३१ वर्षांपूर्वी म्हणजे १९९२ च्या पाच डिसेंबर रोजी श्री राम मंदिराच्या लढ्यात सहभागी झालेल्या राजू धर्मदास याला दहा डिसेंबर रोजी व त्याच्या दोन दिवस आधी श्रीकांत पुजारीला पोलिसांनी अटक केली होती. ३१ वर्षांनंतर जुन्या प्रकरणाला उजाळा देत दोघांना अटक करण्यात आली. याला आता राजकीय रंग चढला असून भाजप आणि काँग्रेस यांच्यात चुरस निर्माण झाली आहे.
द्वेषाचे राजकारण नाही : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कारसेवकांच्या अटकेच्या प्रकरणात द्वेषाचे राजकारण केले नसल्याचे स्पष्ट केले. हुबळीतील ३० वर्ष जुन्या प्रकरणात एका कार्यकर्त्याच्या अटकेवर टिप्पणी करताना, त्यांनी चुकीचे काम करणार्यांवर काय कारवाई करावी? असा सवाल केला. त्यांना मोकळे सोडायचे का, असा प्रश्न करून जुनी प्रकरणे निकाली काढण्याची सूचना केली आहे. त्यावर पोलिसांनी कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले. हुबळी येथील कारसेवकाच्या अटकेच्या प्रकरणात आम्ही द्वेषाचे राजकारण केलेले नाही. कोणाही निरपराधांना अटक करण्याचे काम केलेले नाही, ते म्हणाले.
राममंदिराच्या उद्घाटनासाठी केवळ रामभक्तांनाच निमंत्रित करण्यात आले आहे, या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, कोणाला निमंत्रित करण्यात आले आहे आणि कोणाला नाही, हे माहित नाही. ज्यांना आमंत्रण आहे ते जातील आणि ज्यांना नाही ते जाणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.
आज भाजपचा निषेध
हुबळी येथील एका जुन्या प्रकरणात हिंदू कार्यकर्त्यांच्या अटकेविरोधात भाजप आज राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र म्हणाले. बंगळुरमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, हुबळी येथे एका जुन्या प्रकरणात हिंदू कार्यकर्त्यांच्या अटकेचा भाजप तीव्र निषेध करतो. राज्य सरकार हे हिंदुविरोधी सरकार असल्याची वारंवार आठवण करून देत असल्याचा हल्ला त्यांनी चढवला.
संपूर्ण देश आनंदोत्सव साजरा करत असताना रामभक्तांना अटक करणे योग्य नाही. यामागे त्यांचा हेतू काय, असा सवाल करून मुख्यमंत्र्यांनीच राज्यातील शांतता आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम सुरू केले आहे. या घटनेकडे केवळ कर्नाटकच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. जगातील हिंदू कार्यकर्ते जल्लोषात असताना काँग्रेस सरकारने हे काम सुरू केले आहे. केवळ भाजपच नाही तर सर्वजण पक्षाचा विचार न करता त्याचा निषेध करत आहेत. भविष्यात घडणाऱ्या घटनाना राज्याचे गृहमंत्री जबाबदार असतील, असा संताप विजयेंद्र यांनी व्यक्त केला. आज भाजप राज्य सरकारच्या कृतीविरोधात लढा देणार आहे. बंगळुर येथील फ्रीडम पार्क येथेही आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.