मांड्या : कर्नाटकातल्या मांड्या जिल्ह्यातल्या केरागोडू गावात हनुमान ध्वज उतरवण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. १०८ फूट उंच स्तंभावरुन हनुमान ध्वज हटवण्यात आल्याने वाद पेटला आहे. या वादाने राजकीय वळण घेतलं आहे. भाजपा नेते, कार्यकर्ते विरुद्ध कर्नाटक सरकार असा वाद पेटला आहे. त्यामुळे या गावात कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. भाजपाने कर्नाटकात इतर जिल्ह्यांमध्ये निषेध आंदोलन सुरु केलं आहे. केरागोडू गावात कलम १४४ लागू करण्यात आलं आहे.
मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात
रविवारी हनुमान ध्वज उतरवण्यावरुन भाजपा, जनता दल सेक्युल आणि बजरंग दल हे एकत्र आले होते. निषेध आंदोलन सुरु होतं. त्यानंतर मोठ्या संख्येने पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून सर्वतोपरी काळजी घेण्यात येते आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केरागोडु आणि शेजारच्या बारा गावांमधील गावकऱ्यांनी आणि काही संघटनांनी रंगमंदिर या ठिकाणी ध्वज स्थापना करण्यासाठी निधी गोळा केला होता. भाजपा, जनता दल सेक्युलर हे कार्यकर्ते यात आघाडीवर होते अशीही माहिती समजते आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हनुमान ध्वज १०८ फुटांचा होता. काही लोकांनी या झेंड्याचा विरोध केला. त्यानंतर तालुका अधिकाऱ्यांनी हा ध्वज हटवणण्याचे निर्देश दिले. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या उपस्थिती ध्वज उतरवण्यात आला. त्यानंतर रविवारी मोठ्या प्रमाणावर तणाव वाढला होता. पोलीस आणि गावकरी, तसंच भाजपाचे कार्यकर्ते यांच्यात वाद झाला होता. या वादाने आता राजकीय रंग घेतला आहे.
आंदोलनाला वेगळं वळण
निषेध आंदोलनादरम्यान आमदार रवि कुमार यांचे बॅनर फाडण्यात आले. तसंच काही आंदोलनकर्त्यांनी सिद्धरामय्यांच्या नेतृत्वातल्या काँग्रेस सरकारवर आणि मांड्या गावाचे आमदार गनीगा रविकुमार यांच्याविरोधात घोषणा केल्या. तसंच नारेबाजीही केली. तसंच या ठिकाणी जय श्रीरामचे नारे देण्यात आले. दुपारच्या नंतर आंदोलकांना बळाचा वापर करुन तिथून हटवण्यात आलं. तसंच या जागेवरुन हनुमान ध्वज काढून तिथे तिरंगा फडकवण्यात आला.