बंगळूर : विधानसौध येथे पाकिस्तान जिंदाबादचा नारा दिल्याच्या आरोपावरून बंगळूर पोलिसांनी अखेर आज तीन जणांना अटक केली. अलिकडेच विधानसभेतून राज्यसभेसाठी झालेल्या निवडणुकीत विजयी झालेले काँग्रेसचे उमेदवार नासीर हुसेन यांच्या समर्थकांनी पाकिस्तान झिंदाबाद घोषणा दिल्याचा आरोप आहे. त्यावरून विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले होते.
विधानसौध येथे कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार यांनी दिलेल्या फिर्यादीच्या आधारे विधानसौध पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आज सायंकाळी आरोपीला अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दिल्लीस्थित इल्तियाज, आर. टी. नगरचा मुनावर आणि हावेरी जिल्हा बॅडगी येथील मोहम्मद शफी नाशीपुडी अशी त्यांची नावे असून, आता या तिन्ही आरोपींना चौकशीनंतर न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
बंगळुर सेंट्रल डिव्हिजन पोलिसांनी पाकिस्तान समर्थक घोषणा देणाऱ्या तीन आरोपींच्या अटकेची पुष्टी केली आहे आणि या संदर्भात मीडिया स्टेटमेंट जारी केले आहे.
एफएसएल अहवाल, परिस्थितीजन्य पुरावे, आरोपीचे म्हणणे आणि तपासादरम्यान सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे आम्ही आरोपींना अटक केली आहे. सध्या आरोपीची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना कोरमंगल येथील न्यायाधीशांच्या घरी हजर करून पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.