बेंगळुरू : कर्नाटकमधील हसन लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रज्ज्वल रेवण्णाचे सेक्स स्कँडल प्रकरण उजेडात आल्यानंतर त्याने भारताबाहेर पळ काढला. त्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रेवण्णाचा पासपोर्ट रद्द करण्याची कारवाई करावी, अशी मागणी केली होती. आज रेवण्णाच्या विरोधात लुक आऊट नोटीस काढण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेवण्णाच्या विजयासाठी सभा घेतल्यामुळे काँग्रेसकडून टीका होत आहे. मात्र काँग्रेसच्या एका नेत्याने या प्रकरणावर केलेल्या भाष्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे. कर्नाटकचे उत्पादन शूल्क मंत्री रामप्पा तिम्मापूर हे नेहमीच वादग्रस्त विधानं करत असतात. पण रेवण्णा प्रकरणात देवाचा उल्लेख केल्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.
काय म्हणाले कर्नाटकचे मंत्री?
उत्पादन शूल्क मंत्री रामप्पा तिम्मापूर म्हणाले, “रेवण्णा यांच्यासारखे घाणेरडे विचार या देशात कुठेही पाहायला मिळाले नसतील. कदाचित त्यांना यात गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवायचा असेल. पुराणात भगवान श्रीकृष्णासह महिला भक्तीभावासह राहत होत्या. बहुधा प्रज्ज्वल रेवण्णाला श्रीकृष्णाचाही विक्रम मोडीत काढायचा होता.”
रामप्पा यांच्या विधानामुळे आता वाद उद्भवला आहे. भाजपाचे नेते मोहन कृष्णा यांनी टीका करताना म्हटले की, काँग्रेसने जेव्हा त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला, तेव्हापासून त्यांची दिवाळखोरी दिसत आहे. आता ते सनातन धर्माची थट्टा करू लागले आहेत. रामप्पा तिम्मापूर यांचे विधान अतिशय लाजिरवाणे असून हिंदू धर्मातील देवांचा अवमान केल्यामुळे त्यांना मंत्रिमंडळातून तात्काळ बरखास्त केले पाहीजे, अशी मागणी त्यांनी केली.
मोहन कृष्णा यांनी एक्सवर पोस्ट टाकत म्हटले की, काँग्रेस आणि हिंदू धर्म हे एकत्र येऊ शकत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. दरम्यान इस्कॉनचे उपाध्यक्ष राधर्मन दास म्हणाले की, हल्ली सनातन धर्माचा अवमान करणे ही फॅशनच झाली आहे.
सोशल मीडियावरही अनेक लोक आपला संताप व्यक्त करत आहेत. काँग्रेसच्या मंत्र्याने प्रज्ज्वल रेवण्णा आणि भगवान श्रीकृष्ण यांची बरोबरी करण्याचा घाणेरडा प्रकार केला आहे.