बंगळूर : माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे पुत्र आणि जेडीएस पक्षाचे नेते एचडी रेवण्णा यांना आज ( दि. ४) कर्नाटक सरकारच्या विशेष तपास पथकातील (एसआयटी) अधिकाऱ्यांनी अटक केली. बंगळुर केआर नगर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या अपहरणाच्या गुन्ह्याच्या संदर्भात ही कारवाई करण्यात आल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. दरम्यान, कथित सेक्स स्कँडल प्रकरणी एचडी रेवण्णा आणि त्यांचा मुलगा प्रज्वल रेवण्णा यांना अंतरिम जामीन देण्यास नकार दिला आहे.
अंतरिम जामिनास न्यायालयाचा नकार
कथित सेक्स स्कँडल प्रकरणी एचडी रेवण्णा आणि त्यांचा मुलगा प्रज्वल रेवण्णा यांना अंतरिम जामीन देण्यास नकार दिला आहे.
प्रज्वल रेवण्णाविरोधात सीबीआय ‘ब्लू कॉर्नर नोटीस’ जारी करणार?
कथित सेक्स स्कँडल प्रकरणी हसन लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रज्वल रेवण्णा आणि त्यांचे वडील एचडी रेवण्णा यांच्यासाठी अडचणी आणखी वाढ झाली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ‘ब्लू कॉर्नर नोटीस’ काढण्याची शक्यता आहे, असे वृत्त ‘इंडिया टूडे’ने दिले आहे. दरम्यान, एचडी रेवण्णा देश सोडून पळून जाण्याची शक्यता लक्षात घेता त्यांना लूकआउट नोटीस जारी करण्यात आली होती. या प्रकरणी सुमारे ७०० जणांनी राष्ट्रीय महिला आयोगाला खुले पत्र लिहून रेवण्णा यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सेक्स स्कँडल प्रकरणाच्या चौकशीसाठी ‘एसआयटी’ स्थापन
प्रज्ज्वल यांचे महिलांसह आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडीओ व्हायरल झाले. महिलांवर दबाव आणून त्यांचा लैंगिक छळ करण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पीडितांमध्ये काही शासकीय कर्मचारी असल्याचेही सांगण्यात येते. यानंतर कर्नाटक राज्य महिला आयोगाने २६ एप्रिल रोजी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. विशेष तपास पथक नेमावे, असेही राज्य सरकारला सुचविले होते. त्यानंतर प्रकरणाच्या चौकशीसाठी कर्नाटक सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले. दरम्यान, प्रज्वल रेवण्णा यांचा सहभाग असलेल्या कथित सेक्स स्कँडल प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक बी. के. सिंग यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीकडे एफआयआर पाठवण्यात आला आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाने सोशल मीडियावर असंख्य आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या व्हिडिओंमध्ये प्रज्वल रेवण्णा अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार करत असल्याचे दिसून आले आहे. प्रज्वल रेवण्णा २६ एप्रिल रोजी कर्नाटकातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर देश सोडून गेल्याचे समजते. यावरून महिला आयोगाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.