नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका गावात विषारी दारू पिल्याने तब्बल 85 जणांचा मृत्यू झाला आहे. अलीगडमधील करसुआ गावात हा भयंकर प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी मुख्य आरोपीसह आतापर्यंत एकूण 33 जणांना अटक करण्यात आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
या घटनेप्रकरणी आतापर्यंत 33 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये काही गुन्हेगारांचासुद्धा समावेश असून त्यांच्या नावावर 50-50 हजार रुपयांचे बक्षीस आहेत.
येथील करसुआ गावात विषारी देशी दारूची विक्री केली जात आहे. त्यामधून आज 85 जणांचा बळी गेला आहे. गावात विषारी दारुची विक्री केली जात असल्याची अनेक वेळा गावकऱ्यांकडून तक्रार करण्यात आली होती. मात्र यावर प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही. त्याचा परिणाम आज तब्बल 85 जणांचा बळी गेला आहे.
सरपंच रितेश उपाध्याय यांनी स्वतः याबाबत उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रारी केली होती. यानंतर उत्पादन शुल्क विभागाने या दारूच्या दुकानाला क्लिन चिट दिली. मात्र आजच्या घटनेमुळे आता प्रशासन खडबडून जागं झाल्याचे दिसून येत आहे. याआधी सरपंच यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये तक्रार देऊन हे दारूचे हे दुकान बंद करण्याची मागणी केली होती. मात्र यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नव्हती.
या प्रकरणाच्या तपासासाठी 6 सदस्यीय समितीची नियुक्त करण्यात आली आहे. ही समिती पुराव्यांच्या आधारे छापेमारी करत आहे. अवैध दारू निर्मितीत वापरण्यात येणारं साहित्य जप्त करण्यात आलं आहे. पोलीस सातत्याने छापेमारी करत आहेत. अशी महिती एसएसपी कलानिधी यांनी दिली आहे.
चार दिवसांपुर्वी ही घटना घडली असून दररोज मृतांचा आकडा वाढत आहे. तसेच हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मात्र प्रशासनाकडून मृतांची आकडेवारी लपविण्यात येत आहे. असा आरोप केला जात आहे. दरम्यान प्रशासनाने आतापर्यंत केवळ 25 मृत्यूची माहिती दिली आहे. याशिवाय झालेले मृत्यू संशयास्पद आहेत असून या मृतदेहांच्या शवविच्छेदन अहवालानंतरच सत्य समोर येईल, असा दावा त्यांनी केला आहे. असे एका वृत्त वाहिनीकडून यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.