आंदोलननगर केंद्रातील घटना :150 जणांना दिली लस
निपाणी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने विविध उपाययोजनांसह लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार सोमवारी निपाणी शहरातील पाच केंद्रावर लसीकरण करण्यात आले. मात्र येथील आंदोलननगर लसीकरण केंद्रावर लसीकरणामध्ये राजकारण होत असल्याचे सांगून नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर या केंद्रावर 150 जणांना लसीकरण करण्यात आले. प्रशासनातर्फे सोमवारी निपाणीतील महात्मा गांधी हॉस्पिटल, कोल्हापूर वेस वरील आरोग्य उपकेंद्र, आंदोलन नगरातील प्राथमिक शाळा, पोलीस स्थानक आवारासह 5 ठिकाणी लसीकरण करण्याची सोय केली होती. यावेळी मात्र प्रभाग क्रमांक आकरा आणि बारा मधील नागरिकांना देण्यात येणार असल्याची माहिती सर्वत्र पसरली. त्यामुळे माजी नगरसेवक दिलीप पठाडे यांनी शाहूनगर लसीकरण केंद्रावर येऊन लसीकरणमध्ये राजकारण करत असल्याचा आरोप केला. त्यामुळे नगरसेविका दिपाली गिरी यांनीही दोन्ही प्रभागातील नागरिकांना लसीकरण झाल्यानंतर प्रभाग 13 प्रभागातील नागरिकांना नसल्याचे सांगितले. यावरून पठाडे आणि गिरी यांच्यामध्ये काही काळ शाब्दिक चकमक उडाली. अखेर अंगणवाडी व आशा कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून हा वाद संपुष्टात आणण्यात आला.
‘शासनाने जवळच्या केंद्रावर कुठेही जाऊन लसीकरण करून घेण्याची मुभा दिली आहे. पण आंदोलन नगरातील केंद्रावर केवळ 11 आणि 12 प्रभागातील नागरिकांना सवलत दिली जात होती. इतर प्रभागातील नागरिकांना परत पाठवले जात असल्याने आपण जाब विचारला. त्यामुळे प्रभागातील काही जणांना लस दिली तर काहींना पुन्हा सायंकाळी येण्याचे सांगून परत पाठवण्यात आले.’ – दिलीप पठाडे, माजी नगरसेवक, निपाणी.
‘आंदोलन नगरातील लसीकरण केंद्रावर 11, 12 प्रभागातील नागरिकांच्या लसीकरण सुरू करण्यात आले होते. तेथील लसीकरण संपल्यानंतर उर्वरित प्रभागातील लसीकरण करण्यासाठी आलेल्या नागरिकांना रांगेत उभे राहण्याची विनंती केली होती. यावरून राजकारण करण्याचा प्रश्नच येत नाही. शहरातील सर्वच नागरिकांना लसीकरण केले जाणार आहे.’ – दिपाली गिरी, नगरसेविका निपाणी