नवी दिल्ली : बुध्दपोर्णिमेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेला संबोधित केलं. ते म्हणाले, कोरोना संकट काळात गौतम बुध्दांनी दिलेल्या शिकवणीचा मोठा आधार आहे. निसर्गाचा आदर करणं, ही बुध्दांनी दिलेली शिकवण महत्वाची आहे. बुध्दांची तत्वे दीपस्तंभासारखे आहेत.
कोरोनामुळे देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. आज संपूर्ण देश संकटात आहे. या काळामध्ये आरोग्यसेवेसाठी आघाडीवर असणारे डॉक्टर, आरोग्यसेविका, नर्स यांनी आपली पर्वा न करता रुग्णांची सेवा केली. कोरोनामुळे अनेकांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावले आहे. याबद्दल मी सहवेदना व्यक्त करतो, असेही पंतप्रधान म्हणाले. वर्षभरात कोरोनावर लस शोधणार्या भारतीय वैज्ञानिकांचा अभिमान आहे, असेही त्यांनी नमूद केले.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशातील विविध राज्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आले आहे. काही ठिकाणी कडक निर्बंधही लावण्यात आले आहेत. दरम्यान, देशात मागील २४ तासांमध्ये २ लाख ८ हजार ९२१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. २ लाख ९५ हजार ९५५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ४ हजार १५७ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.