बेळगाव : केंद्र सरकारच्या कृषी सुधारणा कायद्यांविरोधात विविध शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला आज सहा महिने पूर्ण झाले. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय संयुक्त किसान मोर्चाने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत बेळगावातही या कायद्यांविरोधात काळा दिन पाळण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी काळे झेंडे फडकावत आंदोलन केले. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्याहीताच्या आड येणारे कृषी सुधारणा कायदे आल्याच्या निषेधार्थ व हे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली देशभरातील विविध शेतकरी संघटनांनी दिल्लीच्या सीमेवर बेमुदत आंदोलन सुरु केले आहे.
त्याला बुधवारी ६ महिने पूर्ण झाले. पार्श्वभूमीवर आज देशभरात घरांवर, दुकानांवर आणि वाहनांवर काळे झेंडे लावून काळा दिन पळून सरकारचा निषेध करण्याचे आवाहन राष्ट्रीय संयुक्त किसान मोर्चाने केले होते. काँग्रेस आमदार नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या घरावर काळा झेंडा फडकावल्याचा व्हीडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. काँग्रेससह अन्य १२ विरोधी पक्षांनीही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. बेळगावातही काळे झेंडे फडकावून आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध शेतकरी संघटनांच्या सदस्यांनी हातात काळे झेंडे घेऊन केंद्र सरकारचा तीव्र निषेध केला.
यावेळी पत्रकारांशी बोलताना भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष सिडगौडा मोदगी म्हणाले, शेतकरी आंदोलनाला आज ६ महिने पूर्ण झाले. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय संयुक्त किसान मोर्चाने देशात काळा दिन पाळण्याचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देऊन आम्ही आंदोलन करत आहोत. भांडवलशहांच्या फायद्यासाठी आणलेल्या या कायद्यांमुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे. केंद्राने हे कायदे त्वरित मागे घ्यावेत.
केंद्र सरकारच्या विरोधात लॉकडाउन असतानाही सामाजिक अंतर पाळून शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले.
Belgaum Varta Belgaum Varta