मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ : राजकीय हालचालीना वेग
बंगळूर : बी.एस. येडियुराप्पा यांनी प्रथमच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची आपली तयारी असल्याचे सांगितल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. जोपर्यंत भाजप हायकमांडचा विश्वास आहे तोपर्यंत आपण राज्य सरकारचे नेतृत्व करत राहू, असे सांगून त्यांनी नेतृत्व बदलाची मागणी करणाऱ्यांना एक प्रकारे इशाराच दिला असल्याचे मानण्यात येत आहे.
मुख्यमंत्र्यांविरोधात कांही मंत्री आणि आमदारांकडून वारंवार तक्रारी केल्या जात असल्याच्या, प्रसार माध्यमांच्या प्रश्नांला उत्तर देताना ते म्हणाले की, “मी अशा उपक्रमांवर प्रतिक्रिया देणार नाही. जोपर्यंत हायकमांडने माझ्यावर विश्वास ठेवला आहे, तोपर्यंत मी मुख्यमंत्रिपदावर कायम राहीन. ज्या दिवशी ते मला पद सोडायला सांगतील, त्याच क्षणी मी राजीनामा देईन आणि राज्याच्या विकासासाठी रात्रंदिवस काम करेन.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मी पक्ष आणि सरकारमधील घडामोडींबाबत कोणतीही कोंडी करीत नाही. पक्ष नेतृत्वाने मला संधी दिली आहे, ज्याचा मी चांगला उपयोग करीत आहे. बाकी सर्वकांही हायकमांडवर सोडले आहे.
नाराज आमदारांच्या एका गटाने मुख्यमंत्र्यांना काढून टाकण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याच्या वृत्तावर त्यांचे हे विधान आहे. राज्य सरकारच्या नेतृत्वाविरोधात तक्रारी घेऊन काही नेते अलीकडेच दिल्लीला गेले होते.
येडियुराप्पा यांनी राज्यात ‘पर्यायी नेतृत्व नसल्याच्या’ चर्चा त्यांनी फेटाळून लावली. “असे कोणतेही पर्यायी नेते नसल्याचा दावा करण्यास मी सहमत नाही,” असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. “राज्यात आणि राष्ट्रीय पातळीवर पक्षात पर्यायी नेते नेहमी आहेत,” असे ते म्हणाले.
मी प्रत्येक गोष्टीसाठी तयार आहे. मी कोणावर टीका करणार नाही. उद्या राजीनामा द्या म्हणून श्रेष्ठीनी मला आदेश दिल्यास, आनंदाने राजीनामा देईन. पक्षाने मला सर्व काही दिले. मला याची जाणीव आहे. मी संघाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे, असे ते म्हणाले.
नेतृत्वबदलाचा मुद्दा कित्येक महिन्यांपासून चर्चेत आला आहे. तथापि, मुख्यमंत्र्यांनी याबद्दल कधीच गंभीर विधान केले नाही.
मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य माध्यमांसमोर केले असले तरी, पक्षातील विरोधकांना व हायकमांडला हा एकप्रकारे संदेश असल्याचे मानले जात आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. पंचायत राज्य व ग्रामीण विकास मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी आपल्या खात्यात मुख्यमंत्री सतत हस्तक्षेप करीत असल्याची हायकमांड व राज्यपालांकडे तक्रार केली होती. पर्यटन खात्याचे मंत्री सी. पी. योगेश्वर व कांही ज्येष्ठ आमदारांनी मागील आठवड्यातच दिल्लीला जाऊन नेतृत्व बदलाची हायकमांडकडे मागणी केली होती. त्याबरोबर येडियुराप्पा समर्थक आमदारांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या नेतृत्वाचे समर्थन केले होते. या सर्व घडामोडीवर येडियुराप्पांच्या आजच्या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे.
मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचे हे विधान म्हणजे एक राजकीय डावपेचाचा भाग असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याने त्यांच्या विरोधकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. येडियुराप्पा यांना जोपर्यंत हायकमांडचा पाठिंबा आहे, तोपर्यंत कोण काहीही करु शकत नसल्याचा स्पष्ट संदेश असल्याचे मानण्यात येत आहे.
हायकमांडशी संघर्ष करण्याच्या मनःस्थितीत नसलेल्या येडियुराप्पा यांनी पक्षातील नेतृत्वावर अप्रत्यक्ष विश्वास दाखवून नेतृत्व बदलाची मागणी करणाऱ्यांना त्यांनी फटकारले आहे.
त्यांच्या या वक्तव्यावर पक्षश्रेष्ठी कोणती भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
*निष्ठावतांची सह्यांची मोहीम*
येडियुराप्पा यांनी राजीनाम्याची तयारी दर्शविताच त्यांच्या समर्थक आमदारांनी सह्यांची मोहीम हाती घेतली आहे. येडियुराप्पाच कार्यकाळ संपेपर्यंत मुख्यमंत्रीपदावर रहावेत यासाठी त्यांच्या समर्थनार्थ सह्या घेण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. येडियुराप्पा यांना भाजपच्या ८० टक्के आमदारांचा पाठिंबा असल्याचे समजते.