
जायंट्स आय फौंडेशनचा पुढाकार
बेळगाव : मूळच्या पुणे येथील व सध्या रामलिंगखिंड गल्ली बेळगाव येथे वास्तव्यास असलेल्या उर्मिला आत्माराम प्रभू यांचे वयाच्या ७८व्या वर्षी काल रात्री साडेअकरा वाजता दुःखद निधन झाले. निधनाची बातमी समजताच जायंट्स आय फौंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष मदन बामणे यांनी तात्काळ त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून देहदान व अवयवदानाबाबत सविस्तर माहिती दिली आणि समाजोपयोगी कार्यासाठी देहदान करण्याची विनंती केली.
त्यांचे पुतणे सिद्धार्थ प्रभू यांनी समाजहिताचा विचार करून तत्काळ होकार दर्शविला. त्यानुसार उशिरा रात्री जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीरशास्त्र विभागास देहदान करण्यात आले. तसेच के एल ई नेत्रपेढी येथे नेत्रदान व के एल ई रोटरी स्किन बँक येथे त्वचादान करण्यात आले.
या कार्यासाठी शरीरशास्त्र विभागाचे कर्मचारी विरण्णा रोणद, स्किन बँकेच्या अश्विनी इंगळे, डॉ.अजिंक्य पाटील, मंगला बिजरगी तसेच नेत्रपेढीचे डॉ. विष्णुनाथ एस यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या देहदानामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अध्ययनाची संधी मिळणार असून भविष्यातील डॉक्टर घडण्यास मदत होणार आहे
नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळणार असून त्यांचे जीवन प्रकाशमान होण्यास मदत होणार आहे तर त्वचादानामुळे भाजलेल्या किंवा गंभीर जखमी रुग्णांना उपचारासाठी अमूल्य मदत होणार आहे.
एका व्यक्तीच्या निधनानंतरही अनेकांना नवजीवन देण्याचे हे अत्यंत पुण्यकार्य उर्मिला प्रभू यांच्यामुळे झाले असल्याने मदन बामणे यांनी प्रभू कुटुंबीयांचे मनःपूर्वक आभार मानले.
जायंट्स आय फौंडेशनचे आवाहन
मृत्यूनंतरही समाजासाठी काहीतरी देऊन जाण्याची ही सुवर्णसंधी आहे. देहदान, नेत्रदान व अवयवदान याबाबत भीती किंवा गैरसमज न ठेवता प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यावा. आपल्या एका निर्णयामुळे अनेकांचे जीवन बदलू शकते. मृत्यूनंतरही जिवंत राहण्याचा मार्ग म्हणजे देहदान आणि अवयवदान.
समाजहिताच्या या चळवळीत सहभागी व्हा आणि इतरांनाही प्रेरित करा असे आवाहन अवयवदानाची जागृती करणाऱ्या जायंट्स आय फौंडेशनच्या वतीने करण्यात येत असून ९४४८१९१२६६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta