अंगणवाडी केंद्रांमधील रिक्त पदे ९० दिवसांच्या आत भरण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. बेंगळुरू मध्ये सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान त्यांनी ही माहिती दिली.
विधानसभेच्या कामकाजात बुधवारी कापू मतदारसंघाचे आमदार गुर्मे सुरेश शेट्टी यांनी अंगणवाडीतील रिक्त पदांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. याला उत्तर देताना लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या रिक्त जागा भरण्यासाठी विशेष ऑनलाईन सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा निवड समितीमार्फत ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली जात आहे.सेविका आणि मदतनीसांची निवड करताना स्थानिक रहिवाशांनाच प्राधान्य दिले जात असल्याचे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले. संबंधित गावात पात्र उमेदवार उपलब्ध नसल्यास, त्याच ग्रामपंचायत किंवा होबळी क्षेत्रातील उमेदवारांच्या अर्जाचा विचार केला जातो, असे त्यांनी यावेळी नमूद केले. उडुपी जिल्ह्याचा संदर्भ देत लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, जिल्ह्यात सध्या २६ अंगणवाडी सेविका आणि १३२ मदतनीसांची पदे रिक्त आहेत. यापैकी १६ सेविका आणि १३१ मदतनीसांच्या भरतीची ऑनलाईन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, जिल्हा निवड समितीने तात्पुरती निवड यादी जाहीर केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta