Friday , May 1 2026
Breaking News

“परीक्षा म्हणजे क्षमतांची कसोटी; आत्मविश्वासाने सामोरे जा!” : सीमाकवी रवींद्र पाटील

Spread the love

 

गोजगे हायस्कूलमध्ये दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात
बेळगाव (प्रतिनिधी) : “परीक्षा ही केवळ गुणांची स्पर्धा नसून विद्यार्थ्यांच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची खरी कसोटी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भीती न बाळगता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे. तसेच विद्यार्थ्यांनी गुणांसोबत गुणवान, संस्कारवान आणि जबाबदार नागरिक बनणेही तितकेच आवश्यक आहे. मोठी स्वप्ने पाहा, जिद्दीने प्रयत्न करा आणि शिक्षणाच्या बळावर समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करा,” असे प्रेरणादायी मार्गदर्शन प्रमुख वक्ते सीमाकवी रवींद्र पाटील यांनी केले.

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल, गोजगे येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष शिवाजी यळगे होते.

यावेळी प्रमुख पाहुणे डी.बी.पाटील व कोमल गावडे सर यांनीही विद्यार्थ्यांना परिश्रम, शिस्त आणि आत्मविश्वास यांच्या बळावरच जीवनात यश मिळते, असे सांगितले व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.

कर्नाटक राज्यात सेट परीक्षेत पहिली आल्याबद्दल मच्छे येथील कु. तृप्ती देसाई हिचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी तिनेही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक जे. बी. मुतगेकर यांनी केले. त्यांनी शाळेतील विविध सहशालेय उपक्रमांचा व शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. या प्रसंगी दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला स्मार्ट टीव्ही व नेत्यांचे फोटो भेट देऊन शाळेबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी कार्यक्रमाला शाळा सुधारणा समितीचे उपाध्यक्ष खाचो चलवेटकर, प्राथमिक मराठी शाळेचे अध्यक्ष निरंजन अष्टेकर, कृष्णा कणबरकर व विनोद कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच शिक्षक एस. आर. पाटील, एस. वाय. मुतगेकर, आर. एस. चिकमट व ए. बी. बामणे यांच्यासह विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आदर्श विद्यार्थी म्हणून मारुती शंकर सुतार तर आदर्श विद्यार्थिनी म्हणून संस्कृती यळगे व कोमल भोसले यांना गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट खेळाडू म्हणून शिवम कणबरकर व उत्कृष्ट खेळाडूंनी म्हणून नमिता कैलास शहापूरकर यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतांतून शाळेबद्दलच्या आठवणी व्यक्त केल्या. जे. डी. बिर्जे यांनी पारितोषिक वितरणाचे सूत्रसंचालन केले. आवाहन वाचन एन. पी. हुंद्रे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश जाधव सर यांनी केले, तर एस. वाय. खन्नूकर मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले. समारंभामुळे शाळेच्या परिसरात भावनिक तसेच प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.

About Belgaum Varta

Check Also

प्रादेशिक आयुक्त कार्यालयातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

Spread the love  बेळगाव : जमिनीचे बिगरशेतीमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींमुळे एका व्यक्तीने बेळगावच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *