बेळगाव : भारत विकास परिषदेतर्फे ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ रविवारी सायंकाळी जीजीसी सभागृहात अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित खास आकर्षण असलेल्या “होम मिनिस्टर” स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
प्रारंभी अक्षता मोरे यांनी संपूर्ण वंदे मातरम् प्रस्तुत केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते भारतमाता व स्वामी विवेकानंद प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राष्ट्रीय महिला कार्यकारिणी सदस्य स्वाती घोडेकर यांनी भारत विकास परिषदेची राष्ट्रीय ध्येयधोरणे स्पष्ट केली. प्रा. अरुणा नाईक यांनी महिला दिनाबाबत आपले उदबोधक विचार प्रकट केले. सुखद देशपांडे यांनी महिलांना आरोग्याबाबत घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर महिला दिनानिमित्त गेली 29 वर्षे सेवाकार्य करणाऱ्या बेळगाव भाविपच्या सर्व महिला सदस्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
दुसऱ्या सत्रात महिलांसाठी खास आकर्षण “होम मिनिस्टर” खेळांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सर्व महिलांनी हिरिरीने सहभागी होऊन आनंद लुटला. विनायक मोरे यांनी स्पर्धेचे नेटके संयोजन केले. नंदिता गिलबिले यांनी अखेर स्पर्धा जिंकून होम मिनिस्टरचा बहुमान मिळविला. त्यांना आकर्षक पैठणी देऊन खास गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतिभा हल्लप्पनवर यांनी केले. ज्योती प्रभू यांनी आभार मानले. यावेळी रजनी गुर्जर, विद्या इटी, उमा यलबुर्गी, शुभांगी मिराशी, प्रिया पाटील, स्मिता भुजगुरव, तृप्ती देसाई, मंगल कोलेकर, नंदिनी पाटील, ज्योत्स्ना गिलबिले, मंगल कुलकर्णी, गीता बागेवाडी, प्राचार्य व्ही. एन. जोशी, डॉ. व्ही. बी. यलबुर्गी, डॉ. जे. जी. नाईक, विनायक घोडेकर, के. व्ही. प्रभू, डी. वाय. पाटील, सुभाष मिराशी, गणपती भुजगुरव, पी. एम्. पाटील, नामदेव कोलेकर, अमर देसाई, पी. जे. घाडी आदि उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.
Belgaum Varta Belgaum Varta