
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दिवंगत दीपक दळवी यांच्या कुटुंबीयांची आज शुक्रवारी महाराष्ट्राचे माजी मंत्री व आमदार जयंत पाटील यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आपले आयुष्य वेचणारे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे झुंजार व्यक्तिमत्त्व असलेले अध्यक्ष दीपक दळवी यांचे गेल्या मंगळवारी वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सीमा भागात शोककळा पसरली होती. त्यावेळी महाराष्ट्रातून अनेक आजी-माजी मंत्री, आमदार-खासदारांनी शोकसंदेश पाठवून आपले दुःख व्यक्त केले होते.
या पार्श्वभूमीवर दीपक दळवी यांचे निकटवर्ती असलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री व विद्यमान आमदार जयंत पाटील यांनी आज शुक्रवारी थेट बेळगाव गाठत सावरकर रोड, टिळकवाडी येथील दळवी कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रथम दिवंगत दीपक दळवी यांच्या प्रतिमेला नमन करून आदरांजली वाहिली. त्यानंतर माजी मंत्री पाटील यांनी दीपक दळवी यांच्या शेवटच्या क्षणांबद्दल माहिती जाणून घेऊन दळवी कुटुंबीयांची विचारपूस केली व त्यांचे सांत्वन केले.
याप्रसंगी दळवी यांचे चिरंजीव बुलंद दळवी आणि कुटुंबीयांसह मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, रणजित चव्हाण पाटील, युवा नेते शुभम शेळके, धनंजय पाटील, अंकुश केसरकर, चंद्रकांत कोंडुस्कर, दत्ता उघाडे, महेश जुवेकर, अमित देसाई, किरण हुद्दार, यांच्यासह समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दळवी कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर माजी मंत्री जयंत पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतेमंडळींशी देखील चर्चा केली. यावेळी उपस्थित समितीच्या सदस्यांनी माजी मंत्री पाटील यांना बेळगावसह सीमाभागातील सद्यस्थितीची थोडक्यात माहिती दिली. तसेच, सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सीमा भागातील घडामोडींविषयी चर्चा करणार असून, लवकरच समितीच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणू, असे आश्वासन त्यांनी दिले.
Belgaum Varta Belgaum Varta