Sunday , April 5 2026
Breaking News

सीमाभागाने अभ्यासू, निर्भीड, लढवय्या नेता गमावला; सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच दीपक दळवी यांना श्रद्धांजली ठरेल!

Spread the love

 

बेळगाव : सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी नेहमी कटिबद्ध असलेले, मराठी भाषिकांच्या न्याय हक्कासाठी झटत प्रत्येक आंदोलनातील दळवी यांचे कार्य सीमा भागातील युवकांना नेहमीच प्रेरणा देणारे होते. सीमा प्रश्नासाठी केलेला त्याग सर्वांनाच नेहमी स्मरणात राहील. सीमाभागाने एक अभ्यासू, निर्भीड, लढवय्या नेता गमावला. सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच दीपक दळवी यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत मध्यवर्ती महाराष्ट्र समितीच्या वतीने दीपक दळवी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत समिती नेते व कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

दीपक दळवी यांच्या निधनानिमित्त शुक्रवारी सायंकाळी तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर होते. यावेळी बोलताना किणेकर म्हणाले, दळवी यांच्यासोबत अनेक वर्ष काम करताना बरेच काही शिकता आले. कार्यकर्त्यांना ते नेहमीच प्रोत्साहन देत राहिले. अधिकाऱ्यांसमोर विविध विषयांवर बेधडकपणे आपली बाजू मांडण्याचा, त्याचबरोबर आंदोलने लढे यशस्वी करण्यात त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. त्यांचे कार्य समितीच्या कार्यकर्त्यांना नेहमीच प्रेरणा देत राहील. सीमा प्रश्नाची सोडवणूक हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल असेही त्यांनी सांगितले.

माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले, दीपक दळवी यांच्या निधनाने महाराष्ट्र एकीकरण समितीची तसेच सीमालढ्याची मोठी हानी झाली आहे मात्र संघटनेचे एकजूट आणि सीमा प्रश्नाचे सोडवणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल.

युवा नेते शुभम शेळके म्हणाले, कार्यकर्ते कसे सांभाळावे हे दळवी साहेबांच्या कडून सर्वांनी शिकावे. मुश्किल स्वभावाने त्यांनी युवकांना नेहमीच जोडण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाबरोबर झगडण्याचा त्यांचा कित्ता आम्ही गिरवत राहू.

युवा नेते अंकुश केसरकर म्हणाले, दळवी साहेबांनी अनेक लढे आंदोलने यशस्वी केले. युवकांना ते नेहमीच मार्गदर्शन करत राहिले. समिती ही मते मागण्यासाठी नसून माणसे जोडण्यासाठी आहे हा त्यांचा कानमंत्र आम्ही नेहमीच लक्षात ठेवू.

माजी नगरसेवक नेताजी जाधव म्हणाले, दीपक दळवी यांनी काढलेल्या बेळगाव ते मुंबई पायी मोर्चामुळे सीमा प्रश्नाला बळ मिळाले. त्यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर नागपूर मोर्चाद्वारे महाराष्ट्रात सीमा प्रश्नांची खऱ्या अर्थाने जनजागृती झाली. कर्नाटक सरकारची दडपशाही वाढली आहे ती मोडून काढणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल.

माजी उपमहापौर रेणू किल्लेकर म्हणाल्या, अधिकाऱ्यांबरोबर कसे बोलावे हे त्यांच्याकडून शिकता आले. सीमा प्रश्नासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. निष्ठा आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर सीमा प्रश्नाची सोडवणूक हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल.

युवा नेते मदन बामणे म्हणाले, दळवी साहेब म्हणजे सीमा प्रश्नाचा ध्यास घेतलेले व्यक्तिमत्व होते केवळ सीमा प्रश्नासाठीच नव्हे तर मराठी भाषा आणि संस्कृती जतन करण्याचे कार्य त्यांनी केले.

मराठा मंदिर अध्यक्ष अप्पासाहेब गुरव म्हणाले, दीपक दळवी यांचे कार्य पुढे नेण्यासाठी प्रत्येकाने आत्मचिंतन करावे आणि सीमा प्रश्नाच्या लढ्याला पुढील दिशा देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत.

मराठा बँकेचे माजी चेअरमन दिगंबर पवार म्हणाले, दळवी साहेबांनी सीमा भागातील युवकांना चळवळीत सक्रिय राहण्यासाठी नेहमीच प्रोत्साहित केले.त्यांना सहकार क्षेत्राचे चांगली जाणीव होती. सीमा प्रश्न विषयी त्यांनी केलेला त्याग आणि कष्ठ नेहमीच स्मरणात राहील.

सतीश देसाई, खानापूरचे गोपाळ पाटील, राजेंद्र मुतकेकर, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, पंढरी परब, विश्वजीत हसबे, ऍड. अमर यळ्ळूकर, विनायक पाटील, प्रकाश अष्टेकर यांनी ही दीपक दळवी यांच्या कार्याला उजाळा देत श्रद्धांजली वाहिली.

शोकसभेत खानापूर तालुका म.ए. समितीचे कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई यांनी शोक प्रस्ताव प्रस्ताव मांडला. युवा समितीचे श्रीकांत कदम यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तर धनंजय पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या शोक संदेशाचे वाचन केले.

About Belgaum Varta

Check Also

नाथ पै चौक ते बसवेश्वर चौक डबल रोडवर गतिरोधक घालण्याची नागरिकांची मागणी

Spread the love  बेळगाव : नाथ पै चौक ते बसवेश्वर चौक डबल रोड येथे कार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *