
बेळगाव : जनतेला विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त बनली आहे. अशा वेळी गोरगरीब जनतेला अंत्यविधीचा खर्चही परवडेनासा झाला आहे. याकडे लक्ष देऊन बेळगाव महानगरपालिकेच्या वतीने कोल्हापूरच्या धर्तीवर बेळगावात मोफत अंत्यविधी व्यवस्था करण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. 25 एप्रिलपासून बेळगावच्या शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत शेणी गोवऱ्यांवर मोफत अंत्यसंस्कार व्यवस्था सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी दिली आहे.
आमदार अभय पाटील यांनी आज रविवारी शहापूर मुक्तीधाम स्मशानभूमीला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत महापालिकेचे आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाळी, तसेच आरोग्य अधिकारी संजय डुमगोळ उपस्थित होते. आम. अभय पाटील यांनी यावेळी शहापूर स्मशानभूमीतील कामकाजासंदर्भात माहिती घेतली. गेल्या पंचवीस वर्षांपासून शहापूर स्मशानभूमीच्या सुधारणेसाठी कार्यरत असलेल्या मुक्तीधाम सेवा सुधारणा मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत काकतीकर यांनी स्मशानभूमीतील कामकाज तसेच भावी काळातील विकास कामासंदर्भात माहिती दिली.
यावेळी बोलताना अभय पाटील यांनी पुढील काळात एक कोटी रुपये खर्च करून शहापूर स्मशानभूमीचा संपूर्ण कायापालट करण्यात येणार आहे. मुक्तिधाम सुधारणा मंडळ तसेच दक्षिण भागातील विविध संघ संस्थांच्या सूचनांनुसार स्मशानभूमीत विकासाची कामे राबवली जाणार आहेत. याचबरोबर शहरातील गोरगरीब जनतेला शेणीच्या गोवऱ्यांवर मोफत अंत्यसंस्कार व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले.
या कामात ग्रामीण भागातील ज्या लोकांना शेणींचा पुरवठा करता येत असेल त्यांनी, महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. त्याचबरोबर शहरातील दानी व्यक्ती, सेवाभावी संस्थांनी ही शेणीच्या गोवऱ्या देणेबाबत आवाहन केले. मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाचे विजय सावंत, प्रकाश जरताकर, राजू माळवदे, परशुराम पिटके, हेल्प फोर निडीचे सुरेंद्र अनगोळकर आदी यावेळी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta