Tuesday , December 9 2025
Breaking News

बेळगावमध्ये राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा 25 मेपासून

Spread the love

बेळगाव : केएलई विद्यापीठ, कर्नाटक राज्य जलतरण संघटना (केएसए) आणि स्थानिक स्विमर्स क्लब बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या दि. 25 ते 29 मे 2022 या कालावधीमध्ये एनआरजे केएलई विद्यापीठ राज्यस्तरीय उपकनिष्ठ आणि कनिष्ठ जलतरण अजिंक्यपद -2022 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती स्पर्धेचे समन्वयक उमेश कलघटगी यांनी दिली

शहरातील सुवर्ण जेएनएमसी स्विमिंग पुलच्या ठिकाणी आज मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. बेळगावमध्ये प्रथमच होणाऱ्या पाच दिवसांच्या या स्पर्धेमध्ये राज्यभरातील सुमारे 800 जलतरणपटू सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा सुवर्णा जेएनएमसी ओलंपिक साईज स्विमिंग पूलमध्ये होणार आहे. या स्पर्धेतील यशस्वी जलतरणपटूंची अखिल भारतीय राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड केली जाणार असून ही स्पर्धा राजकोट भुवनेश्वर येथे होणार आहे.

बेळगामध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी 70 तांत्रिक अधिकारी उपस्थित असणार आहेत. कर्नाटक राज्य जलतरण संघटनेने आत्तापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तसेच इतर मोठ्या जलतरण स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले आहे. यावेळी प्रथमच त्यांनी बेळगाव शहरात ही राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा आयोजित केली आहे, असे कलघटगी यांनी सांगितले.

या स्पर्धेसाठी केएलई विद्यापीठाचे मोलाचे सहकार्य मिळाले असून सदर स्पर्धेमध्ये राज्यात असलेले भारतातील मातब्बर जलतरणपटू सहभागी होणार आहेत. केएलई विद्यापीठाने ही भव्य स्पर्धा आयोजनासाठी पुढाकार घेतल्याबद्दल कर्नाटक राज्य जलतरण संघटना व बेळगाव स्विमर्स क्लब केएलई अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांचे आभारी आहे. सदर स्पर्धेचा उद्घाटन सोहळा दि. 26 मे रोजी विविध मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धेचा सांगता समारंभ दि. 29 मे रोजी होणार आहे.

तरी समस्त क्रीडाप्रेमी बेळगावकरांनी या जलतरण स्पर्धेचा आनंद लुटावा, असे आवाहन उमेश कलघटगी यांनी केले. पत्रकार परिषदेच्या प्रारंभी केएलई विद्यापीठाचे निबंधक डॉ. व्ही. ए. कोठीवाले यांनी सर्वांचे स्वागत केले. याप्रसंगी स्विमर्स क्लबचे सदस्य इंद्रजीत हलगेकर, सुधीर कुसाणे आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी २५ हजार शेतकरी उद्या सुवर्णसौधला घेराव घालणार

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारच्या विरोधात अन्नदात्यांचा संताप अनावर झाला असून, उद्या शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *