
बेळगाव : ग्राम पंचायतीच्या राजकारणातून एका माजी ग्राम पंचायत सदस्याने ग्रा. पं. सदस्याला शह देण्यासाठी चक्क आपल्या लाडक्या कुत्र्याचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. त्यानिमित्त हजारो जणांना गाव जेवण घातले. एक क्विंटलचा केक कापला. गावकर्यांसाठी तीन क्विंटल चिकन, हजारो अंडी, अर्धा क्विंटल काजूकरीचा बेत करण्यात आला होता. वाढदिवसानिमित्त तीन हजारहून अधिक गावकर्यांना जेवण दिले. याप्रकारे विरोधकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला.
जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील तुक्यानहट्टी ग्रा. पं. कार्यक्षेत्रात कुत्र्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. आवडत्या कुत्रा क्रिशचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एक क्विंटलचा केक आणण्यात आला होता. माजी ग्रा. पं. सदस्य शिवप्पा मर्दी, सिद्धाप्पा हम्मण्णावर, शेतकरी नेते भीमसी गडादी यांनी कुत्र्याचा वाढदिवसाचा बार उडवून दिला. याबाबत परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. नव्याने निवडून आलेल्या ग्रा. पं. सदस्याने आपला वाढदिवस थाटात मागील काही दिवसांपूर्वी साजरा केला. त्यावेळी माजी ग्रा. पं. सदस्यांचा कुत्रा, गाढव असा उल्लेख केल्याची माहिती मिळाली. त्यामुळे संतप्त बनलेले माजी ग्रा. पं. सदस्य मर्दी यांनी आपला आवडता कुत्रा क्रिश याचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्याचा निर्णय घेतला.
यासाठी एक क्विंटलचा केक कापला. मोकळ्या वाहनातून गावातील प्रमुख मार्गावरून कुत्र्याची मिरवणूक काढली. तीन क्विंटल चिकन, हजारो अंडी, 50 किलो काजू, चपाती, भात असे जेवण गावकर्यांसाठी आयोजित केले. यावेळी तुक्यानहट्टीसह परिसरातील गावांतून साडेतीन हजारपेक्षा अधिक गावकर्यांनी वाढदिवसाला हजेरी लावून जेवणाचा आस्वाद घेतला. सायंकाळी ऑक्रेस्ट्राचा कार्यक्रम आयोजित केला होता. वाढदिवसानिमित्त धमाल करण्यात आली. यातून विरोधी सदस्यांवर वचपा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.
राजकारणाच्या घडामोडीतून साजरा करण्यात आलेल्या कुत्र्याच्या वाढदिवसाची चर्चा परिसरात चांगली रंगली आहे. राजकीय चढाओढीतून लाखों रुपयांचा चुराडा करण्यात आला आहे.
राजकारणातून चुरस
मागील 20 वर्षांपासून ग्राम पंचायत सदस्य म्हणून शिवप्पा मर्दी आणि त्यांचे सहकारी कार्यरत होते. ते ग्राम पंचायतींमध्ये सदस्य म्हणून सतत निवडून येत होते. परंतु मागील ग्रा. पं. निवडणुकीत त्यांना अनपेक्षितपणे पराभवाला सामोरे जावे लागले. तेथून राजकीय कुरघोडीला प्रारंभ झाला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta