बेळगाव : केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या अग्निपंख योजनेच्या विरोधात देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांना भारतीय कृषक समाज या शेतकरी संघटनेच्या बेळगाव शाखेने पाठिंबा व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांनी निदर्शने करत आज शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे राष्ट्रपतींच्या नावे निवेदन सादर करण्यात आले.
केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने अंमलात आणलेल्या अग्निपंख योजनेच्या विरोधात देशामध्ये अनेक ठिकाणी आंदोलने छेडून निदर्शने करण्यात येत आहेत. या आंदोलनांना जिल्ह्यातील विविध रयत संघटना, अपक्ष राजकीय संघटना, कामगार महिला आणि युवक संघटनांनी आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. आज बेळगाव शहरात भारतीय कृषक समाज या संघटनेनेही राज्याध्यक्ष सिदगौडा मोदगी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडून अग्निपंख या योजनेला विरोध दर्शविला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या अनुषंगाने भारतीय कृषक समाजाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. यांनी निदर्शना दरम्यान केंद्र सरकार विरोध निषेधाच्या घोषणा दिल्या जात होत्या. यावेळी राष्ट्रपतींच्या नावे असलेले अग्निपंख योजना रद्द करावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष सिद्धगौडा मोदगी यांनी केंद्र सरकार आणि केंद्रीय संरक्षण खात्याची अग्निपंख ही नवी योजना सैन्यात भरती होऊन देशसेवा करू इच्छिणाऱ्या युवा पिढीचे भविष्य उद्ध्वस्त करणारी आहे. देशभरात या योजनेला विरोध केला जात आहे. सरकारच्या खाजगीकरण धोरणास सर्वांचा विरोध आहे. नूतन कृषी कायद्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडून सरकारला ते कायदे मागे घेण्यास आम्ही भाग पाडले आहे.
त्यात यश न मिळाल्यामुळे सरकारने अशा तऱ्हेने ही नवीन योजना अंमलात आणली आहे. यामुळे प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या मुलांवर मोठा अन्याय होणार आहे असे सांगून सरकारने सदर योजना तात्काळ मागे घ्यावी यासाठी राष्ट्रपतींनी देखील पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली. यावेळी संजय कुडची, शिवलीला मिसाळे, जयश्री गुरण्णावर आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta