बेळगाव : बेळगावातील कापड व्यवसाय क्षेत्रात क्रांतिकारक पाऊल ठरणाऱ्या बी. एस. चन्नबसप्पा टेक्स्टाईल मॉलचे उद्घाटन रविवारी शानदार कार्यक्रमाद्वारे पार पडले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी उपस्थित राहून शोरूम संचालकांना शुभेच्छा दिल्या. तसेच या उद्घाटनाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात बोलताना कर्नाटकाच्या उद्योग व्यवसायाची प्रगती व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त केली. राज्य सरकारने उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी व्यापक योजना आखल्या आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात राज्याची प्रगती दिसून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर खा. मंगला अंगडी, माजी खा. प्रभाकर कोरे, आ. लक्ष्मी हेब्बाळकर, आ. अनिल बेनके आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी शोरूमच्या वतीने संचालक बी. एस. चंद्रशेखर, बी. एस. शिवकुमार आणि परिवारातील सदस्यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली होती. यामध्ये आशाताई कोरे, आ. महादेवप्पा यादवाड, माजी खा. विजय संकेश्वर, माजी आ. फिरोज सेठ यांच्या सह आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि इतर निमंत्रित उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta