बेळगाव : मराठा समाजाच्या युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतंत्र उद्योजक बनावे. यासाठी मराठा उद्योजकाना एकत्र करून युवकांच्या अडचणी व शंका दूर करण्यासाठी मराठा सेवा संघ बेळगाव यांच्या वतीने दि. 3 जुलै रोजी संभाजी नगर वडगाव येथे उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मराठा सभागृहात आयोजित मेळाव्यास चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संचालक राजेंद्र मुतगेकर, शिवसंस्कार उद्योग मित्रचे अध्यक्ष बी. एम. चौगुले (गोवा), माजी नगरसेवक नेताजी जाधव, यश ऑटोचे मालक संजय मोरे, निवृत्त प्राचार्य महादेव कानशीडे, आर्किटेक्ट व इंजिनीअर आर. एम. चौगुले, माजी मुख्याध्यापक शंकर पुन्नाप्पा चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत मराठा सेवा संघाचे अध्यक्ष किरण धामणेर यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर जिजाऊ प्रतिमेचे पूजन संजय मोरे यांच्या हस्ते तर शिवपूजन राजेंद्र मुतगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मराठा सेवा संघाच्या वतीने उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
मान्यवरांनी यशस्वी उद्योजक कसे बनावे याबद्दल मार्गदर्शन केले. मराठा समाजाच्या युवकांनी उद्योग क्षेत्रात आपला ठसा उमटवला पाहिजे त्यासाठी जिद्द आणि मेहनत करण्याची क्षमता युवकाच्यात असणे गरजेचे आहे, असे राजेंद्र मुतगेकर यांनी सांगितले.
यावेळी मराठा सेवा संघातर्फे इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचे शाल, श्रीफळ, शिल्ड आणि 1001 रु. रोख रक्कम बक्षीस स्वरूपात देऊन गौरविण्यात आले. मेळाव्याचे सूत्रसंचालन मनोहर घाडी यांनी केले. मेळाव्यास बेळगाव शहर परिसरातील बहुसंख्य युवा उद्योजक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta