बेळगाव : प्रगतिशील लेखक संघाच्या साप्ताहिक बैठकीत संघाने आयोजित केलेल्या पहिल्या मराठी साहित्य संमेलनाचा जमाखर्च सादर करण्यात आला. संघाचे कार्यवाह कॉ. कृष्णा शहापूरकर यांनी जमाखर्च सादर केला व संमेलन यशस्वी करण्यासाठी ज्या संस्था आणि व्यक्तींनी सहकार्य केले त्यांचे आभार मानले. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात साहित्य संमेलन आयोजित केले जाईल असे त्यांनी जाहीर केले.
शुक्रवार दि. 1 जुलै रोजी मराठी विद्यानिकेतन येथे सायंकाळी 6 वाजता ही बैठक झाली. संघाचे अध्यक्ष प्राध्यापक आनंद मेणसे अध्यक्षस्थानी होते.
प्रगतिशील लेखक संघाचे सदस्य व जिजामाता सहकारी बँकेचे व्यवस्थापक नितीन आनंदाचे यांनी चारधाम यात्रा करून प्रवास वर्णन करणारे पुस्तक लिहिले आहे. याबद्दल त्यांचा संघातर्फे अॅड. राजाभाऊ पाटील यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बैठकीत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी या विषयावर चर्चा करण्यात आली. आमदारांना पळवून नेणे, ईडीची धमकी देऊन त्यांना आपल्या बाजूला वळविणे तसेच त्यांना वेगवेगळी अमिषे दाखवणे हे जे प्रकार घडले आहेत त्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. हे प्रकार लोकशाहीस मारक आहेत, असे मत पत्रकार उपेंद्र बाजीकर, कृष्णा शहापूरकर, नागेश सातेरी यांनी व्यक्त केले.
तसेच प्रा. आनंद मेणसे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज व कामगार चळवळ याविषयी विवेचन केले व शाहू महाराजांनी कामगार चळवळीसाठी केलेल्या मार्गदर्शनाची त्यांनी माहिती दिली.
बैठकीस भरत गावडे, अॅड. अजय सातेरी, इंद्रजित मोरे, शिवलीला मिसाळे, सागर मरगाण्णाचे, प्रा. संजय बंड, संदीप मुतगेकर, सुभाष कंग्राळकर, रोशनी हुंदरे, किर्तीकुमार दोसी, लता पावशे, अॅड. अशोक पावशे, मजदूर को-ऑप. सोसायटीच्या सेक्रेटरी गायत्री गोणबरे, अर्जुन सांगावकर, प्रभावती शहापूरकर, रिया सातेरी, नंदन ताशिलदार, पत्रकार सुहास हुद्दार, प्रकाश बिळगोजी, महेश काशीद आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta