Wednesday , December 10 2025
Breaking News

गुन्हेगारीच्या विळख्यात बेळगाव

Spread the love

 

रोजचे वृत्तपत्र वाचावयास घेतले किंवा वृत्तवाहिन्या पाहू लागताच डोळ्यासमोर येते ते गुन्हेगारीबाबतचे वृत्त. खून करणे ही आता अतिशय सामान्य गोष्ट झालेली आहे की काय, असे वाटावे अशी परिस्थिती आज बेळगाव परिसरात निर्माण झाली आहे. गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत बारा खून झाल्याची नोंद पोलीस खात्याने केली आहे. सुपारी घेऊन खून करणे, मोटारसायकलचा धक्का लागला यावरून मारामारी करणे व मारामारीचे रूपांतर खुनात करणे, घेतलेले पैसे परत केले नाहीत म्हणून खून झाला आहे. बरे ही रक्कम तरी किती होती, केवळ अडीचशे रूपये. मरण किती स्वस्त होत आहे, याची ही काही उदाहरणे आहेत. अनैतिक संबंधातून खून झाल्याचे प्रकार अनेक आहेत. या प्रकारच्या गुन्हेगारीत जे पकडले गेले आहेत त्यांचा वयोगट ध्यानात घेता आणखी चिंता वाढते. अगदी पंचवीशीतील तरूणांचा यामध्ये सहभाग आहे. खुनाच्या आरोपावरून आता हे तरूण तुरूंगात खितपत पडतील. जेव्हा ते तुरूंगातून बाहेर येतील तेव्हा त्यांच्यावर गुन्हेगार असल्याचा शिक्का बसलेला असेल. ऐन तारूण्यात ही मुले अशी वाया जात आहेत. एकेकाळी शहरी भागातच गुन्हेगारी वाढत असे. पण आता तसे राहिलेले नाही. शहरालगतच्या खेड्यातून गुन्हेगारी वाढत आहे. उपनगरात आता घर बंद ठेवून थोडा वेळही बाहेर जाण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही. बंद घर फोडले जाते. याचा अर्थ कुणीतरी पाळत ठेवून ही कामे करत असणार. घरफोडीचे प्रकार तर सतत वाढत आहेत. उपनगरातून रहदारी तशी कमी असते. सायंकाळच्यावेळी तसा शुकशुकाटच असतो. याचा फायदा घेत घरे फोडली जात आहेत. चीजवस्तू लांबविल्या जात आहेत. काही महिन्यांपूर्वी महिलांच्या गळ्यातील सोन साखळ्या चोरण्याचे प्रमाण वाढले होते. मोटारसायकलवरून येणारे चोरटे महिलांच्या गळ्यातील साखळ्या हिसकावून घेऊन पलायन करीत. हे प्रकार जेव्हा खूप वाढले व त्याची चर्चा वृत्तपत्रातून होऊ लागली तेव्हा पोलीस खात्याला जाग आली. पोलिसांनी दिवसा आणि सायंकाळच्यावेळी गस्त घालण्यास सुरूवात केली. त्यामुळे हे प्रकार कमी झाले. रात्रीच्यावेळी व पहाटेच्यावेळी पोलिसांची गस्त वाढवयास हवी. तरच घरफोड्या कमी होतील. आपल्या पोलीस विभागाकडे पुरेसे पोलीस नसल्यामुळे गस्त घालण्यासाठी आवश्यक तेवढे पोलीस उपलब्धच नाहीत. त्यामुळे चोरट्यांचे फावत आहे. बेळगाव परिसरात अंमली पदार्थ विक्री आणि सेवन करणार्‍यांची संख्या वाढताना दिसते. गांजा हा अंमली पदार्थ सहजपणे उपलब्ध होताना दिसतो. गांजाच्या नशेत गुन्हेगारी करणारे अनेकजण आढळतात. नशेत आपण नेमके काय करीत आहोत, याचे भान त्यांना नसते. ते जेव्हा भानावर येतात, तेव्हा त्यांना आपण काय करून बसलो आहोत, याची कल्पना येते. पण वेळ निघून गेलेली असते. एकदा का गांजाचे व्यसन लागले की मग ते सहजासहजी सुटत नाही. ते जर सोडवायचे असेल तर त्यासाठी तज्ञ मानसोपचारांची मदत घ्यावी लागते. त्यांच्याकडून उपचार करून घ्यावे लागतात. व्यसनाधीन तरुणांची संख्या आणि उपलब्ध तज्ञ यांचे प्रमाण अत्यंत व्यस्त आहे. व्यसनाधीन तरूणांच्यावर उपचार करण्यासाठी आज समाजात पुरेशा संख्येने तज्ञ उपलब्ध नाहीत. याचाही विचार व्हावयास हवा. लोकांना पैशाचे अमीष दाखवून त्यांची फसवणूक करणार्‍यांची संख्या समाजात वाढत आहे. इतकी रक्कम आज आमच्याकडे जमा करा, म्हणजे आम्ही तुम्हाला तीन महिन्यानी एवढी मोठी रक्कम देऊ असे सांगत लोकांना फसविणार्‍या टोळ्या बेळगावात आणि परिसरात निर्माण झाल्याचे दिसते. पैशाच्या अमिषाला माणसे चटकन बळी पडतात. विशेष श्रम न घेता पैसा मिळविण्याचे मार्ग ही मंडळी शोधत असतात. अशीच माणसे या जाळ्यात अडकतात. गुप्तधनाच्या आशेने मांत्रिकांना बळी पडलेले लोक आजही आढळतात. मिरजजवळील म्हैशाळ या गावात जी दुर्घटना घडली आहे ती, खूपच दुःखद आहे. चिंताजनक आहे. अशिक्षित माणसे अंधश्रद्धांना बळी पडली, तर एक वेळ समजता येईल. पण जेव्हा सुशिक्षित माणसेही अशा अंधश्रध्दांना बळी पडतात तेव्हा मात्र चिंता वाटायला लागते.
गुन्हेगारांना पोलिसांचे भय वाटेनासे झाले आहे. पोलीस आमचे करून करून काय करतील? मारहाण करतील, तुरूंगात पाठवतील. पण काही दिवसांनी आम्ही बाहेर येऊच असे म्हणणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे. या तरूणांना कायद्याची भीतीच राहिलेली नाही. समाजात वाढत असलेली बेकारी हे गुन्हेगारी वाढण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. कायमस्वरूपी नोकरी अथवा व्यवसायात गुंतलेला तरूण सहसा गुन्हेगारीचा रस्ता धरत नाही. पण ज्यांना कसली शाश्वतीच नाही पण पैसे मात्र हवे आहेत असे तरूण आणि तरूणी गुन्हेगारीचा मार्ग स्विकारताना दिसतात. म्हणून असे म्हणता येईल की, गुन्हेगारी कमी करण्यासाठी तरूणांच्या हाताला काम देणे आवश्यक आहे. आणि नेमके याच आघाडीवर आपण कमी पडत आहोत. ग्रामीण भागातील रोजगार घटल्यामुळे तरूण वर्ग शहराकडे येताना दिसतो. पण शहरात तरी कोठे नवे रोजगार निर्माण झाल्याचे दिसत नाही. जगण्यासाठी मग हे तरूण गुन्हेगारी क्षेत्राकडे आकर्षित होतात व त्यातूनच गुन्हेगारी वाढताना दिसते. बेळगाव सभोवतालची गुन्हेगारी सर्वांनाच चिंतेत टाकणारी आहे.

About Belgaum Varta

Check Also

टिपू जयंती नको, अब्दुल कलाम जयंती साजरी करा : प्रमोद मुतालिक

Spread the love  बेळगाव : टिपू सुलतान जयंती साजरी करण्याऐवजी अब्दुल कलाम जयंती साजरी करावी. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *