बेळगाव : पंढरपूरला जाताना रस्ता अपघातात मृत्युमुखी पडलेले बेळगावचे फ्रीलान्स छायाचित्रकार राजू शिंदोळकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानात दिव्यांअभावी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशामध्ये अंत्यसंस्कार करावे लागले.
राजू संभाजी शिंदोळकर आणि परशुराम संभाजी झंगरुचे हे शनिवारी सायंकाळी एकादशी निमित विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी कारमधून बेळगावहून निघाले असताना पंढरपूर-सांगोला मार्गावर कासेगाव फाट्यावर कार उलटून झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच तीन जण जखमी झाले असून, पंढरपूरला पोहोचण्यापूर्वी मध्यरात्री हा अपघात झाला. त्यानंतर मृतांचे मृतदेह बेळगावात आणण्यात आले. काल रात्री राजू शिंदोळकर यांच्यावर चिदंबरनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी स्मशानभूमीत दिवाबत्तीची व्यवस्था नसल्याने मोबाईल टॉर्चवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकारामुळे तिथे जमलेल्या लोकांनी आणि मृतांच्या नातेवाईकांनी महापालिकेच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला. महापालिकेच्या अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे लोकांना याचा त्रास होत आहे. बेळगावातील बहुतांश स्मशानभूमींची अशीच दुरवस्था झाली असून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
Belgaum Varta Belgaum Varta