बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कडोली परिसरात सध्या भात लावणी हंगाम युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र सर्वत्र एकाच वेळेला कामे चालु असल्याने कामगारांची टंचाई भासत असून वीज पुरवठ्याअभावीही शेतकर्यांना समस्या येत आहे.
कडोली परिसरासह बेळगाव तालुक्यात सध्या भात लावणी हंगाम युद्धपातळीवर सुरु आहे. गेले पंधरा दिवस पाऊसही सतत पडत असला तरी अजुन जमिनीमध्ये उंबळ सुटण्यासारखे जमिनीत पाणी झालेले नाही. बटाटे, मका, रताळी व शेंगासह इतर पिकांना फटका बसला आहे. तथापि भात लावणीसाठी मात्र अत्यंत पोषक वातावरण आहे. कडोली भागात इंद्रायणी भाताचे उत्पादन अधिक घेण्यात येते. 80% टक्के भात इंद्रायणी लावणी तर फक्त 20% इतर जातीच्या भाताची पेरणी केली जाते. नट्टी लावणीसाठी शेतात चिखल करण्यासाठी वीज पुरवठ्याची फार आवश्यकता भासते. मात्र जोरदार पाऊस, वारा व तांत्रिक दोषाचे कारण सांगुन हेस्कॉमकडून वारंवार वीज पुरवठा खंडित केला जात आहे. याचा शेतकर्यांना फटका बसत आहे. त्यामुळे शेतकरी हेस्काम अधिकार्यांच्या नावे बोटे मोडत आहेत. आवश्यक दुरुस्ती करुन सकाळी दहा ते संध्याकाळी सहापर्यंत विद्युत पुरवठा करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.