Thursday , March 5 2026
Breaking News

माणसाचे व्यक्तिमत्व घडविण्यामध्ये पुस्तकांची भूमिका महत्त्वाची : प्रा आनंद मेणसे

Spread the love

पुस्तकप्रेमी शंकर चाफाडकर यांना पाचव्या स्मृतिदिन निमित्त अभिवादन

बेळगाव : मोबाईलच्या जमान्यात पुस्तके वाचण्याची संस्कृती कमी होत असताना वाचनाची सवय प्रत्येकाला दिशादर्शकाचे कार्य करते. माणसाचे व्यक्तिमत्व घडविण्यामध्ये पुस्तकांची भूमिका महत्त्वाची ठरते. आपल्यातील उणीव भरून काढण्यासाठी पुस्तके वाचनाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन प्रा. आनंद मेणसे यांनी केले.
येथील एल्गार सामाजिक साहित्य परिषद आयोजित पुस्तकप्रेमी शंकर चाफाडकर यांच्या पाचव्या स्मृतिदिन निमित्त अभिवादन आणि वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रम शहीद भगतसिंग सभागृहात संपन्न झाला. प्रा आनंद मेणसे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. व्यासपीठावर चंद्रशेखर गायकवाड, प्रा. सुभाष सुंठणकर, प्रा. संजय बंड, देवदत्त पेडणेकर, प्रा. निलेश शिंदे उपस्थित होते.
प्रारंभी शंकर चाफाडकर यांच्या प्रतिमेला गुलाबपुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत एल्गार सामाजिक साहित्य परिषदचे अध्यक्ष चंद्रशेखर गायकवाड यांनी केले.
वक्तृत्व स्पर्धेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. आनंद मेणसे पुढे म्हणाले, विचारमंचावर येऊन एखाद्या विषयावर बोलणे हे खूप कठीण काम आहे. वक्तृत्व कला आत्मसात करायची असल्यास दररोज दैनिक वृत्तपत्र मोठ्याने वाचले पाहिजेत. वृत्तपत्राचे वाचन करताना योग्य ठिकाणी आवाजातील चढ -उतार, स्पष्ट उच्चार याकडे लक्ष देण्यासोबतच वृत्तपत्रामधील बातम्या जशाच्या तशा उतरून काढण्याचा सराव करायला हवा असे सांगितले.
यावेळी जेष्ठ साहित्यीक प्रा. सुभाष सुंठणकर यांनी पुस्तकप्रेमी शंकर चाफाडकर यांच्या स्मृती जागृत केल्या. शंकर चाफाडकर यांच्या पुस्तक संग्रह करण्याच्या छंदाविषयी आणि पुस्तकांच्या निटनेटक्या ठेवणीची आठवण त्यांनी आवर्जून सांगितली. वाचन संस्कृती रुजविण्याचे कार्य चाफाडकरानी केले. त्यांचे हेच कार्य पुढे चालू ठेवणे हीच त्यांना आदरांजली ठरेल असेही ते म्हणाले. तसेच प्रा. संजय बंड, श्री. देवदत्त पेडणेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी पुस्तकप्रेमी शंकर चाफाडकर यांच्या स्मृतिदिना निमित्त ‘मोबाईलच्या जमान्यात वाचनाचे महत्व’ या विषयावर घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, पुस्तके आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या वक्तृत्व स्पर्धेतील विजेते स्पर्धक : प्रथम क्रमांक- कु. प्रीती मोहन शिंदे, गोगटे कॉलेक ऑफ कॉमर्स बेळगाव, द्वितीय क्रमांक- कु. राजदीप शटूपा वरपे, ज्योती पदविपूर्व महाविद्यालय बेळगाव, तृतीय क्रमांक- साक्षी संदीप पाटील, ज्योती पदविपूर्व महाविद्यालय बेळगाव. याबरोबर उत्तेजनार्थ म्हणून कु. दिव्या पुंडलिक पाटील, कु. नेहा कल्लापा मेणसे, कु. प्रांजल संतोष धामणेकर, कु राखी सोमाना चतुर, कु. मयूर परशराम ठाकर, कु. सोनल शिवाजी तारिहाळकर, कु. प्रतिक्षा सुरेश चौगुले यांनाही गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला सागर मरगाणाचे, शटूपा वरपे, अर्जुन सांगावकर यांच्यासह विद्यार्थी, त्यांचे पालक, संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा. अशोक आलगोंडी यांनी तर प्रा निलेश शिंदे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *