बेळगाव : बेळगावमधील खडेबाजार येथील एका तीन मजली इमारतीच्या बाल्कनीतून जीव धोक्यात आलेल्या मांजराची सुटका करण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. सुमारे तीन तासांच्या परिश्रमनंतर मांजराची यशस्वी सुटका केल्यानंतर नागरिकांनी टाळ्या वाजवून अग्निशमन दलाचे अभिनंदन केले.
प्रेमाने पाळलेले पाळीव मांजराचे एक पिल्लू बेळगावच्या खडेबाजार येथील तीन मजली इमारतीच्या बाल्कनीत अडकले. तेथून परत येत न आल्याने त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. खडेबाजार येथे राहणार्या एका कुटुंबातील मुलांनी या मांजराला अतिशय प्रेमाने पाळले. खिडकीतून बाल्कनीत उडी मारल्यानंतर मांजरी पुन्हा खिडकीत उडी मारू शकली नाही आणि जीवाची भीती वाटत होती. कुटुंबीयांनी मांजरीला वाचवण्याचा प्रयत्न केला पण शक्य झाले नाही. मांजर दोन तास तिथेच म्यांव म्यांव करत अडकून बसली होती. त्यानंतर मालकाने ऍनिमल वेल्फेअर असोसिएशनच्या सदस्यांना फोन केला. यावेळी वरुण कारखानीस हे सदस्यांसह त्याठिकाणी दाखल झाले. मात्र मांजराला वाचविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांनाही यश आले नाही. त्यामुळे अखेर या मांजराच्या बचावासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना बोलवावे लागले. यावेळी मांजराला वाचवण्यासाठी पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान पुढे आले. अग्निशमन दलाचे जवान ट्रक आणि शिडीच्या मदतीने बाल्कनीवर चढले आणि मांजरीला वाचविण्यात यशस्वी झाले.
Belgaum Varta Belgaum Varta