बेळगाव : बेळगावचे एकमेव हुतात्मा बाबू उर्फ मंगेश काकेरू यांचा स्मृतिदिन हुतात्मा बाबू काकेरू चौकात रविवार दिनांक 24 जुलै सकाळी आयोजित करण्यात आला होता.
सालाबाद प्रमाणे या कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिक संघटना, सिद्धार्थ फ्री बोर्डिंग, हुतात्मा बाबू काकेरू चौक सुधारणा मंडळ, बसवाण गल्ली शहापूर येथील आजी-माजी पंच, परिसरातील पंच व युवक मंडळ आणि मराठी पत्रकार संघ तसेच पंडित नेहरू विद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्या ममता पवार यांच्या उपस्थितीत पार पडला.
बसवाण गल्ली शहापूर येथील हा युवक धाडसी व क्रांतिकारक विचारसरणीचा होता. पोलिसांचा ससेमेरा व त्याचा शोध सुरू झाला. हुतात्मा बाबू भूमिगत होऊन मिरजेहून सांगलीला जाताना पोलिसांनी अटक करून सांगलीच्या तुरुंगात रवानगी केली. त्या तुरुंगात सांगलीचा क्रांतीकारक युवक नेता वसंतदादा पाटील आपल्या सहकाऱ्यांसह होते. पुढे तुरुंगातून बाहेर पडताना 24 जुलै 1942 हा दिवस हुतात्मा बाबू यांच्या त्याग व स्वातंत्र्यासाठी शौर्यशाली वीरमरणाचा ठरला.
हुतात्मा बाबू काकेरू यांच्या 79 व्या स्मृतिदिन प्रसंगी गुरुवर्य माजी आमदार परशुराम नंदीहळी, नगरसेवक रवी साळुंखे, संतोष होंगल, हिरालाल चव्हाण, प्रताप काकेरू, ऍड. मोहन सप्रे, किशोर दळवी, किशोर पवार तसेच विविध संस्था संघ यांचे सदस्य उपस्थित होते.