

बेळगाव : कित्तूर तालुक्यातील बच्चनकेरी गावात वीरराणी कित्तूर चन्नम्मा यांच्या राजवाड्याची प्रतिकृती बनविण्यास तीव्र विरोध दर्शवत आज कित्तूर बंदची हाक देण्यात आली होती. प्रशासनाच्या निर्णयाविरोधात आज पुकारण्यात आलेला बंद संपूर्णपणे यशस्वी झाला आहे. बच्चनकेरी गावातील 57 एकर जमीन कित्तूर किल्ल्याची प्रतिकृती बनविण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आली होती. सदर जमीन कित्तूर प्राधिकरणाला सोपविण्यात यावी, असा सरकारचा उद्देश आहे. यासंदर्भात बैलहोंगल उपविभागीय अधिकार्यांना जिल्हाधिकार्यांनी पत्रही लिहिले आहे. यावर आक्षेप घेत कित्तूर राणी चन्नम्मा अभिमान्यांनी आज कित्तूर बंदची घोषणा दिली होती.
कित्तूर बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले होते. कित्तूर राणी चन्नम्मा अभिमान्यांनी निच्चनकी येथील मडिवाळेश्वर मठ ते चन्नम्मा सर्कल असा निषेध मोर्चा काढून राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला.
यावेळी माजी ग्रा. पं. सदस्य बाबासाहेब पाटील व इतर नेते सहभागी झाले होते. यावेळी कित्तूरहून शेकडो वाहनांवरून चन्नम्मा अभिमान्यांनी बेळगाव जिल्हाधिकार्यांकडे येऊन निवेदन सादर केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta